बँकेतच वृद्ध खातेदाराच्या पैशांवर हात साफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 00:42 IST2019-09-16T00:42:09+5:302019-09-16T00:42:15+5:30
बँकेतच ६९ वर्षीय खातेदाराला पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने ठगाने साडेतेरा हजार रुपयांवर हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार साकीनाका परिसरात उघडकीस आला.

बँकेतच वृद्ध खातेदाराच्या पैशांवर हात साफ
मुंबई : बँकेतच ६९ वर्षीय खातेदाराला पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने ठगाने साडेतेरा हजार रुपयांवर हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार साकीनाका परिसरात उघडकीस आला. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अंधेरी-कुर्ला रोड परिसरात राहणारे पारसनाथ भागीरथी रझाक (६९) यांची फसवणूक झाली आहे. शुक्रवारी ते बँकेत ३५ हजार रुपये जमा करण्यासाठी गेले होते. कॅश काउंटरवर जाण्याकरिता पैसे मोजत असताना एका अनोळखी ठगाने त्यांना हेरले. त्यांच्याजवळ जात, त्यांना पैसे व्यवस्थित ठेवा, असे म्हणत त्यांच्याकडील पैसे हातात घेतले व मोजून पुन्हा त्यांच्या हातात दिले. पुढे रझाक यांनी कॅश काउंटरवर पैसे जमा केले असता, त्यात १३ हजार ५०० रुपये कमी असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा, मदतीच्या बहाण्याने ठगाने त्यांच्याकडील पैशांवर डल्ला मारल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर, यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी साकीनाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून साकीनाका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बँकेच्या सीसीटीव्हीच्या मदतीने ते आरोपीचा शोध घेत आहे.
याआधीही वृद्धांची बँकेत फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ पैसे मोजून देण्याच्या बहाण्यानेच ही फसवणूक करण्यात आली आहे़