मुंबई : कर्जाचा हप्ता थकल्यामुळे बँकेच्या वसुलीदाराच्या जाचाला कंटाळून एका २७ वर्षीय चालकाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. ही घटना मालाड परिसरात घडली आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या चालकाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून विजय ओहोळ (४७) या वसुलीदाराविरोधात कुरार पोलिसांनी बीएनएस कायद्याचे कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार सुनील जायसवाल (४०) हे मृत सूरज जायसवाल (२७) याचे मोठे बंधू आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, सूरजने चोलामंडलम बँकेकडून १५ लाखांचे कर्ज घेऊन आयशर वाहन खरेदी केले होते. या कर्जाला सुनील हे जामीनदार होते. सुनील यांना २२ नोव्हेंबर रोजी ‘चोलामंडलम बँक से बोल रहा हू, आपके भाईने आयशर गाडी का हप्ता भरा नही है. हमारा फोन नही उठा रहा है इसलिये मे आप से बात कर रहा हू, असा एका व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर सुनीलने सूरजला फोन केला मात्र त्याने फोन उचलला नाही. सूरजने हप्ता न भरल्याने बँकेने सुनील यांना फोन करायला सुरुवात केली.
तुमचा भाऊ फोन उचलत नाही... - २९ आणि ३० डिसेंबर रोजी कांदिवली पश्चिमला विजय ओहोळने सुनील यांची भेट घेतली. त्यावेळी गाडी तुम्ही घेऊन जा, आम्हाला हप्ता भरणे शक्य नाही, असे सुनीलने विजयला सांगितले. - ३१ डिसेंबरला सकाळी ६ वाजता तो गाडी पार्क केलेल्या ठिकाणी आला. त्याने सुनीलला सांगितले की, तुमचा भाऊ रात्री १२ वाजेपर्यंत फोन उचलत होता. आता सकाळपासून तो फोन उचलत नाही. हे ऐकल्यावर सुनील यांनी सूरजच्या घरी धाव घेतली. - मात्र तो राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. त्याला खाली उतरवून कुटुंबीयांनी शताब्दी रुग्णालयात नेले. - मात्र तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर सुनील यांनी कुरार पोलिसात बँक वसुलीदार विजय याच्यावर भावाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला.