बाणगंगा तलाव : वारसा भग्नावस्थेत, कंत्राटदार निश्चित, अद्याप कार्यादेश नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 12:06 IST2025-01-18T12:06:25+5:302025-01-18T12:06:58+5:30
वाळकेश्वर येथे असलेल्या बाणगंगा तलावाभोवती व्यंकटेश बालाजी मंदिर, सिद्धेश्वर शंकर मंदिर, बजरंग आखाडा, वाळकेश्वर मंदिर, तसेच समाधी, धर्मशाळा, मठ आहेत.

बाणगंगा तलाव : वारसा भग्नावस्थेत, कंत्राटदार निश्चित, अद्याप कार्यादेश नाही
मुंबई : महापालिकेने हाती घेतलेला ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प सध्या रखडला आहे. तलावातील गाळ काढणे आणि पायऱ्यांची डागडुजी, यासाठी कंत्राटदार नेमला असला, तरी त्याला कार्यादेश दिलेले नाहीत. दरम्यान, सध्या विविध उत्सवांमुळे तेथे येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
वाळकेश्वर येथे असलेल्या बाणगंगा तलावाभोवती व्यंकटेश बालाजी मंदिर, सिद्धेश्वर शंकर मंदिर, बजरंग आखाडा, वाळकेश्वर मंदिर, तसेच समाधी, धर्मशाळा, मठ आहेत.
पायऱ्यांचे केले नुकसान
या तलावाच्या काठावर धार्मिक विधी, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही होतात. पुरातन काळातील या तलावाच्या पायऱ्या, त्यांचे दगड, दीपस्तंभ यांची विविध कारणांमुळे दुरवस्था झाली होती.
तलावातील गाळ काढताना आधीच्या कंत्राटदाराने पायऱ्यांचे नुकसान केले. त्यामुळे कंत्राटदाराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामुळे त्याचे कंत्राटही रद्द केले होते.
आतापर्यंतची कामे
पहिल्या टप्प्यात पायऱ्यांवरील १३ झोपड्या काढल्या असून, रहिवाशांचे एसआरएच्या इमारतीत पुनर्वसन केले आहे.
दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन करताना, त्यांची वास्तविकता जपण्यासाठी उडीद डाळ, मेथी, जवस, गूळ, बेलफळ यांपासून तयार केलेल्या मिश्रणाचा वापर केला आहे.
कामाचा पडला विसर?
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभागाच्या सूचीबद्ध कंत्राटदाराच्या माध्यमातून तलावाची डागडुजी पूर्ण केली जाणार असल्याचे यापूर्वी पालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र, या कामाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही.
कामाबाबत उपस्थित होत आहे प्रश्नचिन्ह
तलावाच्या पायऱ्यांची डागडुजी करतानाची एक चित्रफीत व्हायरली झाली होती. त्यात तलावाच्या पायऱ्या बसवण्यासाठी विटांचा चुरा वापरण्यात येत असल्याचे दिसत होते. त्यामुळे या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दुसरीकडे गैरसोय टाळण्यासाठी पालिकेच्या संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पायऱ्यांचे हलणारे दगड तेथेच घट्ट बसविण्यात आले. पायऱ्यांची आणखी दुरवस्था झाल्यामुळे गैरसोय होत असल्याचे भाविकांनी सांगितले.
१०-१२कोटींचा खर्च
राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून आधी हा निधी येणार होता. मात्र, आता पंधराव्या वित्त आयोगाने तलावांच्या पुनरुज्जीवन कामासाठी दिलेल्या निधीतून प्रकल्पाची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे पालिकेचा निधी वापरावा लागणार नाही.