मुंबई : वांद्रे पश्चिमेकडील रेल्वे ब्रिज परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मुख्य म्हणजे अपघातानंतर ट्रकचालकाने जखमी व्यक्तींना कोणतीही मदत न करता तिथून पळ काढला. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला.
सांताक्रुझच्या गोळीबार परिसरात राहणारे तक्रारदार मोहम्मद सोहराब इराटी (२८) गेल्या चार महिन्यांपासून त्यांचा मित्र शकील शेख (२४) याच्यासोबत मजुरीचे काम करतात. तक्रारीनुसार इराटी हे १२ मार्च रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास बोरीवली येथील काम संपवून स्कूटरने शेखसोबत चर्चगेटच्या दिशेने निघाले होते. ते ३:३० च्या दरम्यान वांद्रे पश्चिमच्या रेल्वे ब्रिज परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जात असताना भरधाव ट्रकने मागून ओव्हरटेक करताना त्यांना जोरदार धडक दिली.या अपघातात इराटी आणि शेख हे दोघेही गंभीर जखमी झाले. मात्र जखमींना मदत न करता ट्रक चालक त्या ठिकाणाहून पळून गेला असे इराटी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
त्यानंतर इराटी एका टॅक्सीने शकीलसह उपचारासाठी वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यावेळी उपचार सुरू असताना शकीलचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अनोळखी ट्रक चालकाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.