Join us  

जमावाला बंदी, संचाराला नाही!, नाइट कर्फ्यूबाबत मुंबई पोलिसांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 2:08 AM

night curfew : नाइट शिफ्टमधील व्यवसाय, करमणुकीशी संबंधित पब, रेस्टॉरंट्स, थिएटर ११ वाजता बंद करणे सक्तीचे आहे. त्याव्यतिरिक्त अन्य व्यवसायाला तसेच सर्व अत्यावश्यक सेवांना परवानगी आहे.

मुंबई : मुंबईत नाइट कर्फ्यूदरम्यान पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई असून, संचाराला बंदी नसल्याचे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. नागरिक कामानिमित्त बाहेर पडू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.पाटील यांनी सांगितले की, कर्फ्यू आपली सुरक्षा व आरोग्यासाठी आहे. यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावावर निर्बंध आहेत. नाइट शिफ्टमधील व्यवसाय, करमणुकीशी संबंधित पब, रेस्टॉरंट्स, थिएटर ११ वाजता बंद करणे सक्तीचे आहे. त्याव्यतिरिक्त अन्य व्यवसायाला तसेच सर्व अत्यावश्यक सेवांना परवानगी आहे. नागरिक दुचाकी व चार चाकी वाहनांतून प्रवास करू शकतात. मात्र कारमध्ये चारपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही. आपण कर्फ्यूच्या वेळी फिरायला जाऊ शकता किंवा गाडी चालवू शकता. फक्त पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. यादरम्यान नागरिकांनी मास्कचा वापर करीत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असेही त्यांनी नमूद केले.

परिपत्रक जारी जमावबंदी आदेशाचे परिपत्रकही पोलिसांकडून बुधवारी जारी करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिस