"शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक"; राज ठाकरे व शरद पवारांकडून शोक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 09:51 AM2024-02-23T09:51:38+5:302024-02-23T09:52:43+5:30

शरद पवार यांनीही ट्विट करुन मनोहर जोशींच्या आठवणी जागवल्या आहेत. तसेच, त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 

"Balasaheb's Shiv Sainik till his last breath"; Condolences from Raj Thackeray and Sharad Pawar | "शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक"; राज ठाकरे व शरद पवारांकडून शोक

"शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक"; राज ठाकरे व शरद पवारांकडून शोक

मुंबई - शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री व शिवसेनेच्या जडणघडणीत अगदी सुरुवातीच्या काळापासून बाळासाहेबांसोबत असलेले मनोहर जोशी आज कालवश झाले. मनोहर जोशी यांनी महाराष्ट्राच्या राजकारण मोठी कारकीर्द गाजवली. अगदी नगरसेवक ते मुख्यमंत्री व लोकसभा सभापती म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. सन १९६७ मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसेनेत राहिले. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत. 

मनोहर जोशींचे आज २३ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ३.०२ मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. दिनांक २१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर, आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर बुलढाणा दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजचे सर्वच कार्यक्रम रद्द केले असून ते मुंबईकडे निघाले आहेत. तर, शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विट करुन मनोहर जोशींच्या आठवणी जागवल्या. 

''मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले, अशी आठवण राज ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच, त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली. 


१९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे राज यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही ट्विट करुन मनोहर जोशींच्या आठवणी जागवल्या आहेत. तसेच, त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 

शरद पवारांनीही जागवल्या आठवणी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. स्पष्टोक्ती  आणि धडाडीने काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भुषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले. लोकसभेच्या अध्यक्ष पदी असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भुमिका होती, अशी आठवण शरद पवार यांनी व्यक्त केली. तसेच, मी जोशी कुटूंबीयांप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो, असे म्हणत त्यांनी शोक व्यक्त केला. 

Read in English

Web Title: "Balasaheb's Shiv Sainik till his last breath"; Condolences from Raj Thackeray and Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.