Join us  

महायुतीच्या सभेत बाळासाहेबांचा फोटो गायब; शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी थांबविली सभा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 9:16 AM

भांडुप पश्चिमेकडील लाला शेठ कंपाऊंड येथे महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यासाठी पहिलीच सभा झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या भांडुपमधील सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नसल्याने शिंदेसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. 

भांडुप पश्चिमेकडील लाला शेठ कंपाऊंड येथे महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यासाठी पहिलीच सभा झाली. त्यास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले तसेच महायुतीचे आजी-माजी खासदार, आमदार आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच शिंदे गटाच्या कार्यकत्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मंचावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नसल्याने शिवसैनिक आक्रमक झाले. मंचावर बाळासाहेबांचा फोटो नसल्याने त्यांनी रोष व्यक्त केला. शिंदेसेनेचे नेते व माजी आमदार अशोक पाटील यांनाही कार्यकर्त्यांनी सवाल केला. 

भाजप आमदार राम कदम यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सभा थांबवून बाळासाहेबांचा फोटो मंचावर ठेवत घोषणाबाजी दिली. त्यानंतर कार्यकर्ते निघून गेले. थोड्यावेळाने अशोक पाटील मंचावर परतले. शिंदेसेनेच्या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना यश आले. 

टॅग्स :मुंबईएकनाथ शिंदेबाळासाहेब ठाकरे