Join us  

बाळासाहेबांच्या कुंचल्याने कागद जिवंत व्हायचा; मुख्यमंत्री ठाकरे यांनी जागविल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 8:11 AM

‘फटकारे’ या पुस्तकाच्या निर्मितीमागील आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, जवळपास १९८५ ला बाळासाहेबांनी व्यंगचित्र काढणे थांबविले होते

मुंबई : आपण बाळासाहेबांच्या हातातील कुंचला बघत बघत मोठे झालो. दादर येथील छोटेखानी घरात, बाळासाहेब ओसरीत ड्रॉईंग बोर्ड घेऊन बसायचे, कोऱ्या कागदावर फटकारे मारायचे, बघता बघता तो कोरा कागद जिवंत व्हायचा. बाळासाहेबांच्या या कुंचल्याने अनेकांना फटकारे मारले असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. मुंबई विद्यापीठाच्या बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, सार्थ प्रतिष्ठान आणि मुंबई न्यूज फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने आयोजित बाळासाहेब ठाकरे : चित्र आणि चरित्र या विषयावरील छायाचित्र प्रदर्शनाला शनिवारी त्यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. 

‘फटकारे’ या पुस्तकाच्या निर्मितीमागील आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, जवळपास १९८५ ला बाळासाहेबांनी व्यंगचित्र काढणे थांबविले होते. त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रांचा अमूल्य ठेवा पुस्तक रूपाने पुढे आणण्यासाठी ठिकठिकाणावरून मार्मिकचे जुने अंक गोळा केले गेले. त्यातील अनेक दुर्मिळ आणि निवडक व्यंगचित्रांना रिटच करून ‘फटकारे’ हे पुस्तक तयार झाले. या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वात मोठे काम आपल्या हातून झाल्याचे सांगून त्यांनी समाधान व्यक्त केले. बाळासाहेबांना नेहमीच नाविन्यतेबद्दल कुतूहल असायचे. जेव्हा कधी नवीन कॅमेरा विकत घेतला की ते आवर्जून त्या कॅमेऱ्याबाबत चौकशी करायचे. त्यातील नवीन तंत्रज्ञानाबद्दल ते जाणून घ्यायचे. व्यंगचित्रकार हा उत्तम चित्रकार असलाच पाहिजे, असा बाळासाहेबांचा आग्रह असायचा. व्यंगचित्रांच्या माध्यमातून रेषांचे भाषांतर, त्याचे स्वभाववैशिष्ट्य त्या व्यंगचित्रातून व्यक्त व्हायचे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला रश्मी उद्धव ठाकरे, राहुल शेवाळे, विनायक राऊत, राजन विचारे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, कुलसचिव सुधीर पुराणिक आदी उपस्थित होते.

टॅग्स :उद्धव ठाकरेबाळासाहेब ठाकरेमुंबई