Join us

“महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही”: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 21:45 IST

महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

मुंबई: केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्याचे काम सुरु आहे, हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. महाराष्ट्रातही गेल्या दोन वर्षापासून सातत्याने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून सरकार अस्थिर करण्याचे व महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे पण आम्ही सर्वजण एकजुटीने ही लढाई लढत आहोत. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही, अशी टीका विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, २०१४ नंतर देशातील लोकशाही, संविधान धाब्यावर बसवून सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्सच्या मदतीने लोकनियुक्त सरकारे अस्थिर करण्याचे कारस्थान भाजपकडून सुरु आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपचे नेते दररोज नवनवी कारस्थाने करत असतात पण आम्ही सर्व एकजूट आहोत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत सत्यस्थिती मांडली आहे. आम्ही सर्व राऊत यांच्यासोबत आहोत. राऊत यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपच्या हातातले बाहुले झाल्या असून राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी त्यांचा वापर सुरु असल्याचे अनेकदा पाहिले आहे.

आता तर विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नातेवाईकांना ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही त्यांना त्रास देण्याचे प्रकार सुरु आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. भारतीय जनता पक्ष राजकारणाला आणखी किती खालच्या पातळीवर घेऊन जाणार आहे? महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी सातत्याने या यंत्रणांचा गैरवापर केला जातो आहे, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. यंत्रणांचा वापर करून त्रास देऊन, धमकावून, ब्लॅकमेलिंग करून, महाराष्ट्राला बदनाम करून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे स्वप्न पाहणा-यांचा स्वप्नभंग निश्चित आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :महाविकास आघाडीबाळासाहेब थोरातभाजपा