मुंबई : भारत-पाकिस्तानतील तणावाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे मुंबईत सुरक्षेला प्राधान्य दिले जात असताना पश्चिम रेल्वेच्या प्रमुख टर्मिनसपैकी असलेल्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवर मात्र प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळले. या रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारांवर लावलेले बॉडी स्कॅनर आणि बॅगेज स्कॅनर बंद आहेत.
या दोन्ही स्टेशनवर अनेक प्रवेशद्वारे असली तरीही मुख्य दरवाजावर सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय झालेल्या दिसल्या. येथे प्रवासी कोणतेही सामान घेऊन टर्मिनसमध्ये प्रवेश करू शकतो, असे चित्र आहे.
...तरच बॅगची तपासणीवांद्रे टर्मिनसवर एका सुरक्षारक्षकाला स्कॅनरबाबत विचारल्यावर त्याने सांगितले की, स्कॅनर बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. याशिवाय पार्सल बुकिंग विभागाजवळ प्रतिनिधीने सहज प्रवेश केला, तरीही तेथे असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्याकडे दुर्लक्षच केले. विचारणा केल्यानंतर त्याने सांगितले की, संशयास्पद वाटले तरच तपासणी करतो. त्यामुळे येथे सुरक्षेबाबत फारसे गांभीर्य दिसले नाही. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.