Join us  

'वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो'; भाजपाच्या पराभवानंतर अमृता फडणवीस यांचं ट्विट

By मुकेश चव्हाण | Published: December 04, 2020 3:52 PM

पुणे, नागपूर या बालेकिल्ल्यांसह औरंगाबादमध्येही भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला.

मुंबई:  विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारत भाजपाला धूर चारली आहे. यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजपा यांच्यात चांगलीच जुंपली आहे. याचदरम्यान आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत उडी घेतली आहे. 

राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक निकालांमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का दिला आणि घवघवीत यश मिळवले आहे. तर दुसरीकडे पुणे, नागपूर या बालेकिल्ल्यांसह औरंगाबादमध्येही भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपाला लक्ष्य केले जात आहे. याचदरम्यान ''वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो'', असं ट्विट अमृता फडणवीसांनी केलं आहे. 

"असेल हिंमत तर एक एकट्याने लढा.."- चंद्रकांत पाटलांचे आव्हान

 पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रितपणे आमच्याशी लढत दिली. यामुळे या निकालांमध्ये काहीही धक्कादायक असे घडलेले नाही. हे होणारच होते. परंतू, तरीदेखील भाजपने महाविकास आघाडीला कडवी झुंज देत चांगली लढत दिली.  निकालांमध्ये मुद्दा असा की शिवसेनेला काय मिळालं याचा त्यांनी विचार करायला हवा. त्यांची अमरावतीची जागा गेली. याउलट या निकालांमध्ये भाजपला निदान धुळे नंदुरबार मतदारसंघात फक्त विजय मिळविता आला. मात्र शिवसेनेचे काय ? शिवसेनेने अमरावतीची एकमेव जग देखील गमावली. पण या निवडणुकीत सर्वाधिक फायदा झाला तो राष्ट्रवादी काँग्रेसचा. त्यांनी पुणे, औरंगाबाद व अप्रत्यक्षरीत्या अमरावती शिक्षक मतदार संघात विजय प्राप्त केला. माझे या तिघांना पण थेट आव्हान आहे की, हिंमत असेल तर त्यांनी एकट्याने आमचा सामना करावा. मात्र त्या तीन पक्षांमध्ये हिंमत नसल्याचे स्पष्ट आहे. 

एकटं यायचं की आघाडी करून हे आमचे वरिष्ठ ठरवतील- उपमुख्यमंत्री अजित पवार

आम्ही आघाडी करून लढायचे की एक एकट्याने या संबंधीचा निर्णय आघाडीतील सहभागी पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवतील. आम्हाला कुणी बिन कामाचा सल्ला देण्याची काहीही आवश्यकता नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. एकत्रितपणे लढण्याचे परिणाम या निवडणुकीच्या निकालातून समोर आले आहे. सर्वच मतदारसंघात आघाडीतील पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांनी एकत्रित पणे काम केले. त्यामुळे पुढील काळात अधिकाधिक आघाडीचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्या वेगळे लढण्याने जर विरोधकांचा फायदा होणार असेल तर तसे अजिबात होता कामा नये, असं अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला होता खोचक टोला.. 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीकडून त्यांचा पराभव होईल असा खोचक टोला राष्ट्रवादीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअमृता फडणवीसउद्धव ठाकरेभाजपामहाराष्ट्र विकास आघाडी