Join us  

इलेक्ट्रिक वाहनांना खराब बॅटरीमुळे लागू शकते आग; देखभाल दुरुस्तीकडे लक्ष ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 7:12 AM

केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी आणि चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आर्थिक प्रोत्साहन देत आहे.

- सचिन लुंगसेमुंबई : अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्याची अनेक कारणे असून, मुख्य कारणांपैकी एक शॉर्टसर्किट आहे. बॅटरीची देखभाल दुरुस्ती महत्त्वाची आहे. सभोवतालचे तापमान वाढल्यानंतर बॅटरीची उष्णता वाढू शकते. त्यातून आग लागण्याच्या घटना घडतात, अशी माहिती ऊर्जा आणि संसाधन संस्थेच्या (टेरी) वाहतूक आणि शहर प्रशासन विभागाचे क्षेत्र संयोजक शरीफ कमर यांनी दिली आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापराबाबत कमर यांनी सांगितले की, केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी आणि चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आर्थिक प्रोत्साहन देत आहे. चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय अनेक राज्य आणि महापालिका चार्जिंगच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन आणि अनुदान देत आहेत. बॅटरी आणि चार्जिंगबाबत नवनवे तंत्रज्ञान येत आहे. एक बॅटरी आता १० मिनिटांपेक्षा कमी वेळेत चार्ज होऊ शकते. मात्र, पायाभूत सुविधा आणि चार्जिंगसाठीचा खर्च सध्या जास्त आहे. जलद चार्जर आणि स्लो/मॉडरेट चार्जर्स आहेत. ज्यांना ऊर्जा मंत्रालयाने अधिसूचित केले आहे.

चार्जिंग स्टेशन वाढणार 

सार्वजनिक चार्जिंग स्टेशन पार्किंग स्पॉटस्, व्यावसायिक जागा येथे असतात. एका शहरात ३ किमी x ३ किमीच्या ग्रिडमध्ये आणि महामार्गांवर प्रत्येक २५ किमी अंतरावर एक चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.

घातक वायू प्रदूषणाचा धोका 

जागतिक बँकेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या शोधनिबंधानुसार महाराष्ट्राने जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या को-नेशनच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. त्यातील ९८ टक्के नागरिक घातक वायुप्रदूषणाच्या संपर्कात आहे. यामुळे अस्थमा ते उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि इतर स्ट्रोक आदींचा धोका आहे. 

 प्रदूषणरहित शहरे

इलेक्ट्रिक वाहनांच्या संक्रमणाचा राज्यातील उत्सर्जनावर लक्षणीय परिणाम होईल. प्रदूषण कमी होईल. याव्यतिरिक्त इलेक्ट्रिक वाहनांना वाव देण्यासाठी सरकारी धोरणांमध्ये बदल केले जात आहे.  

टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटरवाहन उद्योग