बॅकबे रेक्लमेशनचे रूप पलटणार; मरिना, हेलिपॅड, टर्मिनलचा आराखड्यात समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:04 IST2025-12-19T13:04:16+5:302025-12-19T13:04:44+5:30
बॅकबे रेक्लमेशन योजनेच्या ब्लॉक तीन ते सहाच्या विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

बॅकबे रेक्लमेशनचे रूप पलटणार; मरिना, हेलिपॅड, टर्मिनलचा आराखड्यात समावेश
मुंबई: दक्षिण मुंबईतील बैंकबे रेक्लमेशन योजनेतील ब्लॉक तीन आणि चार विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मरिना, बोटींचे नवीन टर्मिनल, हॅलिपॅड, आदी सुविधांची निर्मिती बॅकबे येथे केली जाणार आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
बॅकबे रेक्लमेशन योजनेच्या ब्लॉक तीन ते सहाच्या विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामध्ये कॅ. प्रकाश पेठे मार्गाच्या पश्चिमेकडील विधानभवन परिसरापासून ते बैंकबे बस डेपोपर्यतच्या भागाचा समावेश होतो. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या योजनेचा सुधारित आराखडा तयार केला आहे.
नगरविकास विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हा आराखडा एक महिन्यानंतर अमलात येणार आहे. त्यानुसार या भागातील विधानभवनाच्या विस्तार प्रकल्पासह विधानभवन आणि मंत्रालयाजवळील रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी नरिमन पॉइंट ते जगन्नाथ भोसले मार्ग असा नवीन कोस्टल रोड उभारण्याचे प्रस्तावित आहे.
नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टसच्या (एनसीपीए) मागील बाजूस नवीन टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच बॅकबे बस डेपोच्या शेजारी हेलिपॅड प्रस्तावित करण्यात आले आहे.
फ्री प्रेस रोडचे रुंदीकरणही प्रस्तावित
या भागाच्या विकासानंतर वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन या भागातील फ्री प्रेस रोडचे रुंदीकरणही या नव्या आराखड्यात प्रस्तावित केले आहे. त्यानुसार सध्याच्या रस्त्याचे २५ मीटरवरून रुंदीकरण करून २७.४१ मीटर करण्यात येणार आहे.
कोणत्या नव्या सुविधांचा समावेश असणार ?
मरिना प्रकल्पासह बोटी पार्किंगची सुविधा, मच्छीमारनगर येथे मच्छीमारांच्या बोटींच्या पार्किंगसाठी सुविधा
खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, फिशरमेन कॉलनी पार्क, सार्वजनिक जीम.
भूखंड आरक्षण बदलले
दमाणी हाऊससमोरील भूखंड क्रमांक १०९ च्या आरक्षणातही बदल केला आहे. सध्याच्या गार्डनसाठी राखीव भूखंडावरून पालिकेच्या सुविधांसाठी हा भूखंड राखीव केला आहे.