Join us  

Shivsena: 'बच्चू कडू' आता बिनखात्याचे मंत्री, बंडखोर अपक्ष आमदारांवर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 1:36 PM

राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर शिवसेनेनं आपल्या खात्यातील 3 अपक्षांना मंत्रीपद दिलं होत.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर मंत्र्यांवर मोठी कारवाई केली आहे. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिवसेनेतील अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यामध्ये, दोन अपक्ष मंत्र्याचा समावेश असून बच्चू कडू आता बिनखात्याचे मंत्री राहिले आहेत. 

राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर शिवसेनेनं आपल्या खात्यातील 3 अपक्षांना मंत्रीपद दिलं होत. त्यामध्ये, आमदार बच्चू कडू, राजेंद्र येड्रावकर आणि आणखी एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे, ज्यांना शिवसेनेनं मंत्री केलं होतं. त्यातील, मंत्री बच्चू कडू, राजेंद्र येड्रावकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी आता या दोन्ही मंत्र्यांकडील खाती काढून घेतली आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडील शालेय शिक्षण राज्यमंत्री हे खातं आता आदिती तटकरेंकडे देण्यात आलं आहे. तर, इतरही खाते इतर मंत्र्यांना वाटप करण्यात आली आहेत.

बच्चू कडूंकडील खात्यांचे इतरांना वाटप

ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती(कंसात)  आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)  

येड्रावकर यांच्याकडील खातेही काढले

राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)

घटनेतील तरदूतीनुसार कारवाई

महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ मध्ये 6-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणे शक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल, अशी तरतूद आहे त्याप्रमाणे गुवाहटतील मंत्र्यांकडे असेलली खाती आता इतर मंत्र्यांना देण्यात आली आहेत.  

टॅग्स :बच्चू कडूशिवसेनामंत्रीउद्धव ठाकरे