बेबी पेंग्विनच्या बारशाची राणीच्या बागेत धामधूम; ‘नॉडी,’ ‘टॉम’, ‘पिंगू’ असे नामकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 10:48 IST2025-04-26T10:46:02+5:302025-04-26T10:48:07+5:30
‘हम्बोल्ट’ची संख्या पोहोचली २१ वर, पेंग्विन दाखल झाल्यानंतर राणीच्या बागेत पर्यटकांची गर्दी वाढली.

बेबी पेंग्विनच्या बारशाची राणीच्या बागेत धामधूम; ‘नॉडी,’ ‘टॉम’, ‘पिंगू’ असे नामकरण
मुंबई - भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) येथे पेंग्विनने मागील महिन्यात जन्म दिलेल्या दोन नर आणि एक मादी अशा तीन पिल्लांचे बारसे शुक्रवारी पेंग्विन दिनानिमित्त धामधुमीत पार पडले.
‘ऑलिव्ह’ आणि ‘पॉपॉय’ या जोडीने नर पिल्लास जन्म दिला. त्याचे नाव ‘नॉडी’ ठेवण्यात आले, तर, ‘डोनाल्ड’ आणि ‘डेसी’ या जोडीने जन्म दिलेल्या नर पिल्लाचे ‘टॉम’ आणि मादी पिल्लाचे ‘पिंगू’ असे नामकरण करण्यात आले. दरम्यान, प्राणिसंग्रहालयातील हम्बोल्ट पेंग्विन प्रदर्शनामध्ये आता ११ नर आणि १० मादी, असे एकूण २१ पेंग्विन आहेत. महापालिकेने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून विदेशातून हम्बोल्ट पेंग्विन पक्षी मुंबईतील राणीच्या बागेत आणले. त्यांच्यासाठी अद्ययावत पेंग्विन कक्ष १८ मार्च २०१७ पासून सुरू करण्यात आला. पेंग्विन दाखल झाल्यानंतर राणीच्या बागेत पर्यटकांची गर्दी वाढली.
हम्बोल्ट पेंग्विनसाठीची भारतातील पहिली सुविधा
हम्बोल्ट पेंग्विनच्या जैविक, वर्तणूक आणि शारीरिक आवश्यकता विचारात घेऊन या पेंग्विनसाठी भारतातील पहिली सुविधा विकसित करण्यात आली. यात सुरुवातीला असलेल्या सात (तीन नर, चार मादी) पैकी तीन जोड्यांनी यशस्वीपणे प्रजनन केले आहे. गेल्या चार वर्षांत १४ पिलांना जन्म दिला आहे.
४ व ७ मार्चला जन्म
‘ऑलिव्ह’ आणि ‘पॉपॉय’ या जोडीने यंदाच्या हंगामात एक अंड दिले आणि ४ मार्चला नर पिल्लू ‘नॉडी’ जन्माला आले. ‘डोनाल्ड’ आणि ‘डेसी’ या जोडीने दोन अंडी दिली. त्यातून ७ मार्चला, नर पिल्लू ‘टॉम’, तर ११ मार्चला मादी पिल्लू ‘पिंगू’ जन्माला आली. पालकांनी या पिल्लांचे पूर्णपणे संगोपन केले.