स्टेशनवर जन्म झालेल्या बाळाच्या हृदयाला छिद्र; डॉक्टर म्हणतात, आई आणि बाळाची प्रकृती स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 09:42 IST2025-10-21T09:40:47+5:302025-10-21T09:42:05+5:30
प्रसंगावधान राखून केलेल्या या प्रसूतीची चर्चा दिवसभर सोशल मीडियावर रंगली होती.

स्टेशनवर जन्म झालेल्या बाळाच्या हृदयाला छिद्र; डॉक्टर म्हणतात, आई आणि बाळाची प्रकृती स्थिर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चार दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वे मार्गावरील राम मंदिर स्थानकामध्ये एका महिलेने बाळाला जन्म दिला होता. प्रसंगावधान राखून केलेल्या या प्रसूतीची चर्चा दिवसभर सोशल मीडियावर रंगली होती.
प्रसूतीनंतर नवजात बाळाला आणि आई अंबिका झा यांना (२४) महापालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीत बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये बाळाच्या जीवाला मात्र कोणताही धोका नसून बाळ आणि त्याची आई यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सिनेमॅटोग्राफर असलेल्या विकास बेद्रे या तरुणाने महिला डॉक्टर देविका देशमुख यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधत तिची प्रसूती केली. बाळाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्व तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये डॉक्टरांना त्या मुलाच्या हृदयाला छिद्र असल्याचे दिसले.
प्रसूतीपूर्व तपासणीतच दिसले होते छिद्र
कूपरच्या डॉक्टरांनी सांगितले की, महिलेने नायर रुग्णालयात जाऊन नियमित प्रसूतीपूर्व तपासणी केली होती. त्यावेळी त्यांना बाळाच्या हृदयाला छिद्र आहे हे माहीत होते. डॉक्टरांच्या तपासणीत बाळावर हृदयासाठी आता तत्काळ कोणतेही उपचार करण्याची गरज नाही, भविष्यात मात्र शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता आहे.