स्टेशनवर जन्म झालेल्या बाळाला डिस्चार्ज; आई आणि बाळाची प्रकृती स्थिर; डॉक्टरांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 07:22 IST2025-10-28T07:22:03+5:302025-10-28T07:22:17+5:30
सहा दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दोघांनाही घरी सोडण्यात आले.

स्टेशनवर जन्म झालेल्या बाळाला डिस्चार्ज; आई आणि बाळाची प्रकृती स्थिर; डॉक्टरांची माहिती
मुंबई : काही दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वे मार्गावरील राम मंदिर स्थानकामध्ये एका महिलेने बाळाला जन्म दिला होता. प्रसंगावधान राखून केलेल्या या प्रसूतीची चर्चा अजूनही होत आहे. प्रसूतीनंतर नवजात बाळाला आणि आई अंबिका झा (२४) यांना महापालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या बाळाला आणि आईला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. बाळाच्या जिवाला कोणताही धोका नसून बाळ आणि आई यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
१६ ऑक्टोबरला बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय तपासणीत बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे दिसून आले होते. मात्र, त्यासाठी आता कोणत्याही उपचाराची तत्काळ गरज नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतर सहा दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दोघांनाही घरी सोडण्यात आले.
सिनेमॅटोग्राफर असलेल्या विकास बेद्रे या तरुणाने डॉक्टर देविका देशमुख यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधत अंबिका झा यांची प्रसूती केली होती. बाळाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्व तपासण्या करण्यात आल्या होत्या.