Ayodhya Verdict - Faith in the justice system will be strong - Fadnavis | Ayodhya Verdict -न्यायप्रणालीवरील विश्वास दृढ होईल - फडणवीस
Ayodhya Verdict -न्यायप्रणालीवरील विश्वास दृढ होईल - फडणवीस

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरप्रश्नी दिलेल्या निकालामुळे न्यायप्रणालीवरील सामान्यांचा विश्वास दृढ होईल. हा निकाल म्हणजे कोणाचाही विजय किंवा पराजय नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ते पत्रकारांशी बोलत होते. या ऐतिहासिक निर्णयाचे मी स्वागत करतो. भारतीय न्यायप्रणालीतील प्रत्येक घटकाचे आभार मानतो. सर्वच पक्षकार आणि संबंधितांना पुरेसा वेळ, संधी देऊन हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. निकालाचा सहज भावाने स्वीकार सर्व धर्म, समुदायांनी करावा, शांतता-सौहार्द राखण्यास प्रत्येकाने योगदान द्यावे. राष्ट्रीय ऐक्य, देशाच्या अखंडशक्तीला भक्कम करण्याची ही वेळ आहे.
देशातील जनभावनेचा आदर करणारा हा निर्णय आहे. सत्य आणि न्यायाच्या मंथनातून अखेर हा निकाल आला. हा ऐतिहासिक निर्णय एकमताने येणे याला अधिक महत्त्व आहे. बहुभाषीय, बहुधार्मिक सौहार्दाला बळकटी देणारा ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षिलेला भारतभक्तीचा भाव अतिशय महत्त्वाचा आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या आदर्शांचा स्वीकार करीत या निकालाचा सर्वांनी स्वीकार करावा. यातूनच ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’च्या दिशेने भक्कम वाटचाल होईल. देशातील एक मोठा विवाद आता संपला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
>राज्यपालांची घेतली भेट
काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
राम मंदिर निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत त्यांनी चर्चा केली.

Web Title: Ayodhya Verdict - Faith in the justice system will be strong - Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.