Join us  

Ram Mandir Bhumi Pooja: राम मंदिर भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 8:53 AM

राम मंदीर भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमामुळे अनेकांमध्ये उत्साह असून यानिमित्ताने जल्लोष करण्याचे नियोजनही अनेक संघटनांनी केले आहे.

मुंबई/ अहमदनगर: देशभरात आज (5 ऑगस्ट) अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्त आनंद साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण अयोध्या सील करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते भूमिपूजन होऊपर्यंत अयोध्येत एसपीजी (SPG) आणि एनएसजी (NSG) जवानांचा कडेकोट पहारा असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांचीही कसून तपासणी होणार आहे.

राम मंदीर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पोलीस देखील सतर्क राहत आहे. भूमिपूजनाच्या या पार्श्वभूमीवर कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस खबरदारी घेत असून अहमदनगरमध्ये मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे कृत्य केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला आहे. खबरदारी म्हणून या नोटिसा बजावण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

राम मंदीर भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमामुळे अनेकांमध्ये उत्साह असून यानिमित्ताने जल्लोष करण्याचे नियोजनही अनेक संघटनांनी केले आहे. तर काहींनी फटाक्यांची आतषबाजी करत आपला आनंद साजरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आज पासून विविध संघटनांच्या पदाधिकारी यांना नोटिस देण्यास सुरुवात केली आहे. अयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम वेळेस आपण व आपले कार्यकर्ते समर्थक किंवा आपल्या भागात कोणीही कुठल्याही प्रकारचे जल्लोष , विजय मिरवणूक , फटाक्यांची आताषबाजी, घोषणाबाजी केल्यास कार्यकर्त्यांवर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असं नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, राम मंदिरच्या पूजनासाठी नरेंद्र मोदी सकाळी 11.30 वाजता अयोध्येत पोहचतील. भूमिपूजनचा शुभ मुहूर्त 12.44 वाजता आहे. राम जन्मभूमि परिसर आणि आजूबाजूच्या भागाला रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या भागाच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे देण्यात आली आहे. या ठिकाणच्या सुरक्षेसाठी प्रवेश करताना सिक्यूरिटी कोडची व्यवस्था करण्यात आली आहे. ते कोड एकदाच वापरता येणार आहेत. तसेच पोलीस उपस्थितांच्याही तपासण्या करणार आहेत.

टॅग्स :राम मंदिरमनसेअयोध्याराज ठाकरेपोलिसअहमदनगर