Join us

जागरूकता, प्राथमिक पातळीवर प्रतिबंध आणि दोषींना जलद शिक्षा या त्रिसूत्रीनेच बाल लैंगिक शोषण रोखता येईल - विजया रहाटकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 19:47 IST

लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात लढायचं असेल तर त्याविषयी जागरूकता, प्राथमिक पातळीवर प्रतिबंध आणि दोषींना जलद शिक्षा या त्रिसूत्रीची गरज आहे.

मुंबई  - लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात लढायचं असेल तर त्याविषयी जागरूकता, प्राथमिक पातळीवर प्रतिबंध आणि दोषींना जलद शिक्षा या त्रिसूत्रीची गरज आहे अस मत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केलं.

शोषण करणारा आरोपी आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे मात्र अशा घटनांना आळा घातला तर आपण समाजात एका आरोपीचा आणि एका पिडीताचा जन्म थांबवू शकतो अस ही त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या सहकार्याने के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे, शारिटे बर्लिन, बायर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या 'लैंगिक अत्याचाराविरोधात प्राथमिक प्रतिबंध' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईत झालेल्या कार्यक्रमावेळी  लैंगिक अत्याचार घडूच नये म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सोलोजी, बर्लिन यांनी विकसित केलेल्या 'Online Assessment Tool' च विजया रहाटकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.  लहान मुलांविषयी लैंगिक आकर्षक वाटणाऱ्या पण आपल्या हातून गुन्हा होऊ नये म्हणून प्रयत्नशील असलेल्या व्यक्तीवर यामाध्यमातून जर्मनीमध्ये उपचार केले जातात. याचीच सुरुवात आजपासून भारतात होत आहे. 

अतिप्रसंगाच्या घटना घडू शकतील अशा व्यक्तीची के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे यांच्याकडून तपासणी आणि उपचार प्रक्रिया केली जाणार आहे.

यावेळी आयोजित परिसंवादात इन्स्टिट्यूट ऑफ सेक्सोलोजी, बर्लिनचे डॉ क्लाउस बैअर, मानसोपचारतज्ञ डॉ हरीश शेट्टी, समान हक्क कार्यकर्ते हरीश अय्यर आणि मानसोपचारतज्ज्ञ आणि ज्येष्ठ अभिनेते  डॉ. मोहन आगाशे यांनी मार्गदर्शन केले. 

टॅग्स :महिलामहाराष्ट्र