जोरदार पावसाचा विमान वाहतुकीला फटका, ५० पेक्षा जास्त विमानांचे उड्डाण रद्द
By मनोज गडनीस | Updated: July 8, 2024 19:42 IST2024-07-08T19:42:24+5:302024-07-08T19:42:34+5:30
पहाटे एक तास विमानतळ होते बंद

जोरदार पावसाचा विमान वाहतुकीला फटका, ५० पेक्षा जास्त विमानांचे उड्डाण रद्द
मुंबई -मुंबई शहरात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका विमान वाहतुकीला देखील बसला. सोमवारी दिवसभरात मुंबईतून देशात तसेच परदेशात जाणारी ५० पेक्षा जास्त विमाने रद्द करण्यात आली. तर रविवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबईत येणाऱ्या २७ विमानांना अहमदाबाद, इंदूर, हैदराबाद येथे वळविण्यात आले.
विमानतळ प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पावसाचा जोर वाढल्यामुळे सोमवारी पहाटे २ वाजून २२ मिनिटांपासून ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत मुंबई विमानतळावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. इंडिगो कंपनीची दिवसभरात एकूण ४२ विमाने रद्द झाली. एअर इंडिया कंपनीची ६, एअर इंडिया कंपनीची २ तर कतार एअरवेजचे एक विमान रद्द झाले. यापैकी कतार एअरवेजच्या कर्मचाऱ्यांची ड्युटी संपल्यामुळे त्या विमानाचे रद्द झाले होते.