पश्चिम उपनगरात रिक्षाचालकांची मनमानी; मीटर वापरण्याची सक्ती करण्याची प्रवाशांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 13:09 IST2025-12-14T13:08:50+5:302025-12-14T13:09:12+5:30
पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली येथे रिक्षाचालक मीटर न लावता ठरावीक रक्कम मागतात.

पश्चिम उपनगरात रिक्षाचालकांची मनमानी; मीटर वापरण्याची सक्ती करण्याची प्रवाशांची मागणी
मुंबई: पश्चिम उपनगरातील वांद्रे ते दहिसर शहरांत सुमारे २२ किमीच्या अंतरापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मीटरनेच रिक्षा भाडे घेणे हा कायदेशीर नियम असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हा नियम पाळला जात नाही. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचर्णीचा सामना करावा लागत आहे. रिक्षा चालकांच्या मनमानीचा प्रवाशांना फटका बसतो. पर्यटक किंवा बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर अन्याय होतो. सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास घटतो. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई झाली पाहिजे, रिक्षाचालकांच्या मनमनीला आळा घातला पाहिजे, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.
पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली येथे रिक्षाचालक मीटर न लावता ठरावीक रक्कम मागतात. पुढे दोन आणि मागे तीन असे पाच प्रवासी रिक्षात कोंबतात. विशेषतः स्टेशन, बस स्थानके, मार्केट अशा ठिकाणी अवाजवी भाड्याची मागणी केली जाते.
नियम काय सांगतो?
१. प्रत्येक रिक्षामध्ये प्रमाणित इलेक्ट्रॉनिक किंवा यांत्रिक मीटर असणे बंधनकारक आहे. प्रवास सुरू करताना मीटर 'डाउन' करणे हा नियम आहे. भाडे हे निश्चित केलेल्या दरानुसार (उदा. बेसिक भाडे प्रति किमी दर) आकारले पाहिजे.
२. दरवर्षी किंवा नियमानुसार मीटरची कॅलिब्रेशन तपासणी करणे आवश्यक असते. पश्चिम उपनगरात मीटरचे २६ रुपये हा दर आहे. मात्र, मीटर न टाकता जास्त प्रवासी रिक्षा चालक घेतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे रिक्षातील मीटर प्रत्यक्षात फक्त 'शोभेची वस्तू' बनली आहे.