मुंबई - मावशी युसलेस म्हणाली म्हणून तिच्या तीन वर्षीय मुलाचा निर्दयपणे खून करून मृतदेह कुशीनगर एक्स्प्रेसच्या टॉयलेटमधील फ्लश टँकमध्ये लपविणाऱ्या विकासकुमार शाह (३०) याला बीकेसी परिसरातून अटक करण्यात आली. सुरत क्राइम ब्रँच आणि अमरोळी पोलिसांनी ही कारवाई केली.
दुबईतील नोकरी गेल्यानंतर विकासकुमार भारतात परतला. त्यानंतर तो सुरतला त्याची मावशी दुर्गावतीच्या घरी राहायला गेला होता. नोकरी नसल्याने त्याची मावशी त्याला युसलेस असे टोमणे मारायची. त्यामुळे संतापलेल्या विकासकुमारने तिचा मुलगा आकाश उर्फ आरव याचे अपहरण करून निर्घृण हत्या केली. त्याला या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप झालेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.
खेळायला चल म्हणत गेला घेऊन आरोपी दुर्गावती, तिचा पती राजेंद्र यांच्यासोबत अमरोळीतील कृष्णानगर येथे राहात होता. २१ ऑगस्टला दुपारी १२ वाजता त्याने आकाशला खेळायला चल, असे सांगून बाहेर नेले आणि त्याला घेऊन त्याने मुंबईकडे जाणारी कुशीनगर एक्स्प्रेस पकडली. विकासने आकाश टॉयलेटमध्ये नेऊन त्याचा गळा आवळला आणि नंतर गळा चिरून मृतदेह एसी डब्याच्या टॉयलेटमधील फ्लश टँकमध्ये कोंबून तो पसार झाला.
शोध घेणे कठीण होते... विकासच्या मोबाइल लोकेशनवरून तो कुर्ला परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. तो दररोज संध्याकाळी काही वेळ फोन चालू करीत असे. त्यामुळे त्याला शोधणे कठीण झाले होते. रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विकासच्या वांद्रे, दादर आणि कुर्लादरम्यान हालचाली टिपल्या गेल्या. त्याने बीकेसीत नोकरी मिळवली होती.
असा सापडला पोलिसांना विकासचा फोन २५ ऑगस्टला संध्याकाळी सुरू झाला आणि त्याचे लोकेशन बीकेसीमध्ये आढळले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या हालचाली ट्रॅक केल्या. त्यावेळी तो बसने बांद्रा स्टेशनकडे जाताना दिसला. मात्र, स्टेशन परिसरात वाहनांची प्रचंड वर्दळ होती. पोलिसांनी त्याला गर्दीतून उचलला.