आज महापालिकेच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष; इच्छुक उमेदवार गॅसवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 10:27 IST2022-05-30T06:17:26+5:302022-05-31T10:27:10+5:30
सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांना ३१ मेपर्यंत आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिले आहेत.

आज महापालिकेच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष; इच्छुक उमेदवार गॅसवर
मुंबई : मुंबई महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात होत आहे. सकाळी ११ वाजता प्रभागांच्या आरक्षणाची सोडत निघणार असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या महिला सर्वसाधारण, महिला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांसाठी सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एकूण २३६ जागांपैकी ११८ प्रभाग महिलासाठी असणार असून, त्याची निश्चिती आज होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांना ३१ मेपर्यंत आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईत यंदा नऊ प्रभागांची वाढ होऊन २२७ वरून २३६ प्रभाग झाले आहेत. त्यामुळे यंदा आरक्षणात काही जागांची वाढ होऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. पालिकेत या आरक्षणात महिला अनुसूचित जाती आणि जमाती व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी सोडत काढली जाणार आहे. यानंतर आरक्षणावर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी मुंबईतील २४ प्रभागांमध्ये यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
सहा जूनपर्यंत नागरिकांना आपल्या हरकती नोंदवायच्या आहेत. त्यानंतर १३ जूनला अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे. ओबीसी आरक्षणाचा अद्याप तिढा न सुटल्याने ६१ ओबीसी प्रभाग खुले प्रभाग होण्याची, अनुसूचित जातींसाठी १५ प्रभाग आरक्षित असण्याची शक्यता आहे. रंगशारदा सभागृहात सोडतीबाबतच्या तयारीचे कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. सोडतीवेळी इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक गर्दी करण्याच्या शक्यतेने पुरेशी आसन व्यवस्था व अन्य आवश्यक बाबींची पूर्तता प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
नवीन प्रभाग रचनेतील आरक्षण
खुला प्रवर्ग २१९
अनुसूचित जाती १५
अनुसूचित जमाती २
महिला जागा (५० टक्के आरक्षण)
खुला प्रवर्ग ११८
अनुसूचित जाती १५
अनुसूचित जमाती २