रेल्वेस्थानकांतील गर्दीवर लक्ष; सर्व्हे दाखविणार मार्ग, गर्दीचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:20 IST2026-01-21T12:20:18+5:302026-01-21T12:20:56+5:30
सुविधाही देणार

रेल्वेस्थानकांतील गर्दीवर लक्ष; सर्व्हे दाखविणार मार्ग, गर्दीचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन
महेश कोले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रेल्वेस्थानकांवर दिवसेंदिवस वाढत असलेली प्रवासी गर्दी आणि त्यामुळे उद्भवणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी गर्दीचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांचा सर्व्हे सुरू केला आहे. तो रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस (राईट्स) या संस्थेमार्फत करण्यात येत असून, त्यातून मिळणाऱ्या सर्वंकष अहवालानंतर अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे.
सर्व्हेअंतर्गत राईट्स संस्थेच्या सहकार्याने स्थानकांचा अभ्यास करण्यात येत आहे. स्थानकांवरील गर्दीच्या वेळेतील प्रवासी संख्या, गाड्यांच्या ये-जा वेळा, फलाटांची क्षमता, जिने, पादचारी पूल, एक्सेलेटर, लिफ्ट तसेच तिकीट काउंटर व प्रवेश-निर्गमन मार्गांची क्षमता यांचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक स्थानकासाठी स्वतंत्र गर्दी व्यवस्थापन आराखडा तयार केला जाणार आहे. सर्व्हेच्या आधारे स्थानकांवर नवीन होल्डिंग एरिया, विस्तीर्ण प्रतीक्षालय, डिजिटल डिस्प्ले बोर्ड, प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि आपत्कालीन परिस्थितीत वापरता येतील, असे मोकळे मार्ग देण्याची शिफारस आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांना सुरक्षितपणे थांबता येईल, यासाठी आवश्यक जागेचे नियोजनही करण्यात येणार आहे.
सर्व्हेसाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी
प्रत्येक स्टेशनच्या सर्व्हेसाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून, प्रत्येक स्टेशनसाठी अंदाजे ४० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने कामे सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
प्रवासी सुविधांचा विस्तार करण्यासाठी आमचे नियोजन सुरू आहे. यासाठी सर्वंकष प्लॅनिंग सुरू असून त्यानुसार लवकरच नवीन होर्डिंग एरिया आणि प्रवासी सुविधा निर्माण करण्यात येतील.
-विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे