Join us
Daily Top 2Weekly Top 5

होळी, धूलिवंदनासाठी अवघ्या मुंबापुरीचा माहोल 'कलरफुल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:25 IST

रंग, विविध आकारांच्या पिचकाऱ्यांनी दुकाने सजली; किमतीत वाढ, मात्र मागणी कायम

सुरेश ठमके 

मुंबई : होळी, धूलिवंदन, रंगपंचमी हे आनंद, उत्साहाबरोबरच परस्परांमधील नात्यांमध्ये रंग भरणारे सण आहेत. हे सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने बाजारात नवनवीन प्रकारच्या पिचकाऱ्या आणि नैसर्गिक रंग मोठ्या प्रमाणात विक्रीस आले आहेत. यंदा पिचकाऱ्यांच्या किमती काही अंशी वाढल्या असल्या तरी मागणी मात्र कायम असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

धूलिवंदन हा मुंबईत अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. आबालवृद्ध मनसोक्त या उत्सवाचा आनंद लुटतात. परस्परांवर पाणी आणि रंगांची उधळण करत प्रेमाचे रंग भरतात.

लहान मुलांच्या आवडीच्या असलेल्या या सणानिमित्त बाजारात ३०० ते १,५०० रुपयांपर्यंत विविध आकाराच्या, रंगांच्या पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत. छोठी टैंक, पाठीवर अडकवयाच्या, रॉकेटच्या आकारापासून ते विविध कार्टून पात्रांच्या आकारातही या पिचकाऱ्या विक्रीस आल्या असून, त्याला अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. १० लिटर क्षमतेच्या टॅकची पिचकारी १,५०० रुपये, तर तीन फूट उंचीची पिचकारी ७०० रुपयांना विक्रीस असल्याचे त्यांनी सांगितले.

नैसर्गिक रंगांचीच विक्री

परस्परांना रंग लावताना कोणतीही शारीरिक हानी अथवा इजा होऊ नये आणि पक्के रंग लावले जाऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत. 

आम्हीही नैसर्गिक रंग विक्रीस ठेवले आहेत. हे रंग अतिशय कच्चे असून ते पाण्यासोबत धुऊन जाऊ शकतात, असे विक्रेत्यांनी सांगितले.

१०० रुपयांपर्यंत रंगांची पाकिटे बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस साधून अनेक ग्राहकांनी खरेदी केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

पिशव्यांचा वापर टाळा

 पर्यावरणाची हानी तसेच आरोग्याच्या विचार करून प्लास्टिकच्या पिशव्या, फुग्यांचा वापर टाळावा. त्याचबरोबर लोकल ट्रेन, बस, कार, दुचाकींवर पाण्यांनी भरलेल्या पिशव्या, फुगे मारू नयेत, जेणेकरून कोणाला इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :मुंबईहोळी 2025