‘अटल सेतू’चा ताप, रहिवाशांच्या नाराजीनंतर अधिकाऱ्यांकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 10:47 IST2025-01-25T10:46:42+5:302025-01-25T10:47:10+5:30
Atal Setu News: अटल सेतूवरून शिवडीच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचा वेग आता रहिवाशांसाठी डोकेदुखीचा आणि जीवघेणा ठरू लागला आहे. शिवडी फ्री वे खालून अटल-सेतूवर जाणाऱ्या एका अवजड वाहनामुळे मंगळवारी तरुणाला जीव गमवावा लागला. त्यामुळे उद्धवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

‘अटल सेतू’चा ताप, रहिवाशांच्या नाराजीनंतर अधिकाऱ्यांकडून पाहणी
मुंबई - अटल सेतूवरून शिवडीच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचा वेग आता रहिवाशांसाठी डोकेदुखीचा आणि जीवघेणा ठरू लागला आहे. शिवडी फ्री वे खालून अटल-सेतूवर जाणाऱ्या एका अवजड वाहनामुळे मंगळवारी तरुणाला जीव गमवावा लागला. त्यामुळे उद्धवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
या अपघाताची दखल घेत खा. अरविंद सावंत, आ. अजय चौधरी यांनी शाखाप्रमुखांना शिवडी वाहतूक कार्यालयात पाठवले. तेथे पोलिस निरीक्षक जयश्री जयकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. मुंबई पोर्ट ट्रस्ट, एमएमआरडीए, शिवडी पोलिस ठाणे यांच्याशी पत्रव्यवहार करून अटल सेतूवरील शिवडीकडे ये-जा करणाऱ्या वाहनांचा वेग कमी करण्याची तसेच तिन्ही यंत्रणांनी नागरिकांसमवेत संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी यावेळी केली. मागण्यांची पूर्तता न झाल्यास अटल सेतूजवळ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
एमएमआरडीए, वडाळा वाहतूक विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट तसेच शिवडी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अटल सेतूजवळ तत्काळ पाहणी केली. वाहनांमुळे अपघात होऊ शकतात, असे या अधिकाऱ्यांनी मान्य केले.
योग्य प्रस्ताव पाठवा
यावेळी नागरिकांनी केलेल्या सूचनांचा अभ्यास करून वाहतूक विभागाने अटल सेतूवरून शिवडीकडे उतरणाऱ्या गाड्यांचा वेग कमी करण्यासाठी योग्य तो प्रस्ताव एमएमआरडीएला पाठवावा, जेणेकरून या सर्व कामांची पूर्तता करता येईल, असे सांगण्यात आले.
पुढे काय?
आवश्यक उपाययोजना करण्यासाठी एमएमआरडीएला वाहतूक पोलिसांकडून निर्देश हवेत. त्यासाठी उद्धवसेनेने वाहतूक विभागाला पत्र दिले. वाहतूक विभाग त्यांच्या विभागाचे पत्र एमएमआरडीएला देईल. त्यानंतर उपाययोजना करण्यासाठी एमएमआरडीए कंत्राटदारांची नियुक्ती करेल.
या रस्त्यावरील त्रुटी दूर करण्याची मागणी
मुंबईत सायन, परळ सर्कल येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या वाहनांचा वेग मर्यादित राहावा, यासाठी तेथे वाहतूक बेटे तयार करण्यात आली.
अटल सेतूच्या ठिकाणी अशी कोणतीही उपाययोजना नाही. वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर नाहीत.
त्यामुळे सेतूच्या उतारावरून वाहने खाली येताना भरधाव येतात आणि अपघात घडतात, अशी माहिती माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.
अटल सेतूच्या आसपास पदपथही नाही. त्यामुळे स्थानिकांचा जीव आणखी धोक्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.