लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई विद्यापीठातील ‘एम. एस. इन केमिकल सायन्स’ या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही आता अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठाची जॉइंट डिग्री (सह पदवी) मिळणार आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठात नुकताच करार करण्यात आला आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे विद्यार्थी एका वर्षाचे म्हणजेच दोन सत्रांचे शिक्षण अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठात घेऊ शकणार आहेत. येत्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून हा सह पदवीचा अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू केला जाणार आहे.
मुंबई विद्यापीठाने एमएस डेटा एनालिटीक्स आणि एमएस सायबर सिक्युरिटी या दोन अभ्यासक्रमांचे सहपदवी अभ्यासक्रम यापूर्वीच सुरू केले आहेत. त्यांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता केमिकल सायन्समध्येही सह पदवीसाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.
सेंट लुईस विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने याबाबत मुंबई विद्यापीठाला भेट दिली. त्या भेटीत मुंबईतील युएएस वाणिज्य दुतावासात या शैक्षणिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. शिवराम गर्जे, नॅनो सायन्स नॅनो टेक्नोलॉजी विभागाचे संचालक डॉ. विश्वनाथ पाटील आणि सेंट लुईस विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. फ्रेड पेस्टेलो उपस्थित होते.
दोन्ही विद्यापीठामार्फत एम. एस. इन केमिकल सायन्सेस विषयात सहपदवीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाच्या दोन सत्रांचे शिक्षण मुंबई विद्यापीठात मिळणार आहे. तर, द्वितीय वर्षाच्या दोन सत्रांचे शिक्षण सेंट लुईस विद्यापीठात मिळणार आहे. तसेच कार्यांतर्गत प्रशिक्षण करता येईल. विद्यार्थ्यांना दोन्ही विद्यापीठांची पदवी मिळेल, असे प्रा. कुलकर्णी यांनी सांगितले.
सहपदवीचे फायदे
- विद्यार्थ्यांना दोन्ही विद्यापीठांची पदवी मिळेल.
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीची आंतरराष्ट्रीय ओळख वाढेल.
- भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये राहिल्यामुळे वैविध्यपूर्ण शैक्षणिक वातावरण, अध्यापन पद्धती आणि संशोधन पद्धतींचा लाभ होईल.
विद्यापीठ करणार विद्यार्थ्यांना साहाय्य
मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साहचर्य व विद्यार्थी साहाय्य केंद्राच्या वतीने सेंट लुईस विद्यापीठात द्वितीय वर्षाच्या दोन सत्रांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हिसा सुलभीकरण, तज्ज्ञांकडून सपुदेशन, कागदपत्रांचे साक्षांकीकरण, शिष्यवृत्ती साहाय्य, वसतिगृह साहाय्य यासाठी सहायता केली जाणार आहे.