Aslam Shaikh: मुंबईत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पालकमंत्र्यांचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 18:17 IST2022-03-05T18:15:43+5:302022-03-05T18:17:08+5:30
Aslam Shaikh: वर्षानुववर्षे तृतीयपंथीयांना उपेक्षित जीवन जगावे लागत आहे. वर्षानुवर्षे या समाजाला मुलभूत मानवी हक्क मिळविण्यासाठी देखील झगडावे लागत आहे

Aslam Shaikh: मुंबईत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पालकमंत्र्यांचं आश्वासन
मुंबई : तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जीवन जगण्याचा, स्वत:ची प्रगती व उन्नती करण्याचा अधिकार असून तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्राचे स्थानिक आमदार अस्लम शेख यांनी दिली. मुंबई प्रदेश महिला काँग्रेस कमिटी व महिला काँग्रेस तृतीयपंथी सेलच्या माध्यमातून मालाड, मालवणी येथील रमजानअली शाळेच्या प्रांगणात आज तृतीयपंथीयांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या विशेष चर्चासत्र व स्वयं विकास प्रशिक्षण कार्यक्रमात मंत्री अस्लम शेख बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे उपस्थित होत्या.
वर्षानुववर्षे तृतीयपंथीयांना उपेक्षित जीवन जगावे लागत आहे. वर्षानुवर्षे या समाजाला मुलभूत मानवी हक्क मिळविण्यासाठी देखील झगडावे लागत आहे. ओळखपत्र, मालमत्ता हक्क, निवारा अशा विविध बाबींसाठी आजही तृतीयपंथीयांना लढा द्यावा लागत आहे. वयोवृद्ध तृतीयपंथीयांची अवस्था तर फारच बिकट आहे. तृतीयपंथीयांच्या उन्नती व प्रगतीसाठी व त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे, असे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.
कौशल्य विकासाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना स्वत :ची उन्नती करुन घेण्याची संधी मिळू शकेल. यासाठी अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करुन तृतीयपंथीयांमधील कौशल्य विकास करुन त्यांना रोजगारक्षम बनविण्याचा महिला काँग्रेसचा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगून त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.