Join us  

अंधेरी दुर्घटनेचा पहिला बळी, अस्मिता काटकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 8:21 PM

अंधेरी दुर्घटनेतील जखमी असणाऱ्या अस्मिता काटकर यांचे शनिवारी सायंकाळी कूपर रुग्णालयात निधन झाले.

मुंबई : अंधेरी दुर्घटनेतील जखमी असणाऱ्या अस्मिता काटकर यांचे शनिवारी सायंकाळी कूपर रुग्णालयात निधन झाले. तब्बल पाच दिवस मृत्यूशी झुंज देणा-या काटकर यांना सायंकाळी ६.३२ वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले. बहुआघात आणि असंख्य गंभीर जखमांमुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.अंधेरी पश्चिम येथील दळवी चाळीत राहणा-या काटकर या पूल दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्या होत्या. अस्मिता यांच्यावरील उपचारांना अपेक्षित प्रतिसाद लाभत नसल्याने पाच दिवस डॉक्टरांसमोरही आव्हान उभे राहिले होते. अंधेरी गोखले पूल दुर्घटनेत अस्मिता यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यांच्या हातालाही गंभीर दुखापत झाली. गँगरीनमुळे हात गमवावा लागू नये म्हणून अ‍ॅण्टी गँगरीन इंजेक्शने देऊन त्यांचा हात वाचवण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत. गंभीररीत्या जखमी झाल्याने अस्मिता यांना अतिरक्तस्राव झाला. त्यांच्या मेंदूतही रक्ताचे ट्युमर बनले. न्यूरोसर्जन्सनी ते पंक्चर करून पुढील उपचार केले आहेत. मात्र त्या पूर्ण शुद्धीवर आल्याशिवाय काहीच बोलता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते.याविषयी माहिती देताना रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी सांगितले की, गेल्या पाच दिवसांपासून काटकर यांची प्रकृती अत्यवस्थ होती. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्या शुद्धीवर आल्या नाहीत, तसेच त्यांच्या मेंदू, हात आणि शरीरावर असंख्य जखमा झाल्या होत्या. त्यामुळे अथक प्रयत्नानंतर त्यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या मृतदेहाचे रात्री शवविच्छेदन करण्यात येणार असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून समोर येईल...............दोघांची प्रकृती स्थिरकूपर रुग्णालयातील द्वारकाप्रसाद शर्मा (४७) आणि गिरीधर सिंग(४०) यांची प्रकृती स्थिर आहे. तर मनोज मेहता आणि हरीश कोळी यांच्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :अंधेरी पूल दुर्घटनारेल्वे