एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 08:47 IST2025-11-08T08:47:21+5:302025-11-08T08:47:41+5:30
व्यवस्थापन समितीच्या तातडीच्या बैठकीत निर्णय

एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीतील सदस्यांच्या मुद्द्यावरून झालेल्या न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ८) रोजी होणारी निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. सोसायटीच्या विद्यमान व्यवस्थापन समितीने तातडीची बैठक शुक्रवारी घेतली आणि त्यात हा निर्णय घेण्यात आला.
सध्या जी मतदारयादी उपलब्ध आहे, त्या यादीची पडताळणी करणे गरजेचे आहे. तसेच जे नवीन सदस्य झालेले आहेत त्यांना क्रमांक देणे, ओळखपत्र देणे आदी काम बाकी आहे.
या कामाकरिता वेळ लागू शकतो. त्यामुळे ८ नोव्हेंबर अर्थात २४ तासांत हे करणे अशक्य आहे. त्यामुळे शुक्रवारी समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आणि झालेल्या ठरावानुसार, एका स्वतंत्र सनदी लेखापालाची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्या मार्फत मतदारयादीची पडताळणी करण्यात येणार आहे. तसेच, पडताळणी करण्यात आलेली यादी उमेदवारांना देण्यात येणार आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतरच निवडणुकीची तारीख ठरवण्यात येणार असल्याचा ठराव समितीच्या बैठकीत करण्यात आला.