भांडुपमध्ये उभा राहतोय आशियातील सर्वांत मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प, दररोज दोन हजार दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 13:29 IST2026-01-31T13:28:49+5:302026-01-31T13:29:45+5:30
Mumbai News: महापालिकेचा भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्प हा आशियातील सर्वांत मोठा प्रकल्प ठरणार असून, त्यात दररोज दोन हजार दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होणार आहे. येथे ४६ वर्षांपूर्वी बांधलेल्या एक हजार ९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम कमकुवत झाल्याने नवीन प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा

भांडुपमध्ये उभा राहतोय आशियातील सर्वांत मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प, दररोज दोन हजार दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया
मुंबई - महापालिकेचा भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्प हा आशियातील सर्वांत मोठा प्रकल्प ठरणार असून, त्यात दररोज दोन हजार दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होणार आहे. येथे ४६ वर्षांपूर्वी बांधलेल्या एक हजार ९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम कमकुवत झाल्याने नवीन प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प एप्रिल २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी शुक्रवारी या प्रकल्पस्थळाला भेट दिली. यावेळी या प्रकल्पाच्या कामांना गती द्या, असे आदेश त्यांनी दिले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. शिवाय अधिक दर्जेदार पाणी उपलब्ध होणार आहे.
भविष्यातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक गरजा तसेच नागरीकरणामुळे वाढणारी पाण्याची मागणी लक्षात घेता हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. पाण्याची वाढती गरज भागवणे आणि आयुर्मान संपलेल्या जुन्या प्रकल्पाची जागा घेणे, हे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे गगराणी यांनी सांगितले. यावेळी विशेष अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त पुरुषोत्तम माळवदे, पाणीपुरवठा प्रकल्पाचे प्रमुख अभियंता महेंद्र उबाळे यांच्यासह संबंधित अभियंते, अधिकारी यावेळी उपस्थित होते.
वितरण व्यवस्था आणखी बळकट
मुंबईची वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणाचा विचार करता पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण करणे अत्यावश्यक आहे, असे आयुक्त गगराणी यांनी सांगितले.
पाणीपुरवठा करणारी प्रणाली अशी...
मुंबईला पाणीपुरवठ्यासाठी दोन प्रणालींचा उपयोग केला जातो. त्यापैकी एका प्रणालीत तानसा - वैतरणा प्रणालीद्वारे तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि अपर वैतरणा या जलाशयांमधील पाणी जलवाहिन्यांच्या माध्यमातून गुरूत्वाकर्षणाद्वारे भांडुप संकुलात आणले जाते.
दुसऱ्या प्रणालीत या संकुलातील जुन्या व नवीन जलशुद्धीकरण केंद्रामध्ये या पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. त्यानंतर त्याचा मुंबईत पुरवठा केला जातो.