जहांगीरमध्ये अशोक हिंगेंचे 'मॅट्रीक्स ऑफ कॉन्सियसनेस' चित्र प्रदर्शन

By संजय घावरे | Published: January 3, 2024 04:36 PM2024-01-03T16:36:04+5:302024-01-03T16:36:42+5:30

वास्तुविशारद प्रवीण आवटे यांच्या हस्ते झाले उद्घाटन

Ashok Hinge s 'Matrix of Consciousness painting exhibition at Jahangir art gallery mumbai | जहांगीरमध्ये अशोक हिंगेंचे 'मॅट्रीक्स ऑफ कॉन्सियसनेस' चित्र प्रदर्शन

जहांगीरमध्ये अशोक हिंगेंचे 'मॅट्रीक्स ऑफ कॉन्सियसनेस' चित्र प्रदर्शन

मुंबई - चैतन्यदृश्याचे आव्यूह अर्थात 'मॅट्रीक्स ऑफ कॉन्सियसनेस' हे अशोक हिंगे यांच्या चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी तीनमध्ये सुरू आहे. २ जानेवारीला उद्योजक आणि कलाकार प्रवीण आवटे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन ८ जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

'आकार' या नवाने आयोजित करण्यात आलेल्या हिंगे यांच्या प्रदर्शनातील चित्रकृती चित्रांच्या मूळ गाभ्याला हात घालणाऱ्या आहेत. त्यातील चित्रे कलाकाराला वास्तव जगात वावरत असताना आसपास ज्या गोष्टी दृष्टीस पडतात आणि ज्यांची चित्रे काढावीशी वाटतात अशी आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये हिंगे यांनी स्वतःची अशी एक वेगळी चित्रशैली निर्माण केली आहे. त्याचवेळी भौतिकतेच्या कक्षा ओलांडून आसपासच्या गोष्टींच्या कक्षा सशक्त करण्याच्या बाबतीत काहीशी साशंकता त्यांच्यात आहे.

त्यांचा देहबोलीवर भर असतो आणि त्यातून मग त्यांच्या चित्रांमध्ये मध्ये ती अॅक्शन डोकावते. त्यांच्या रेषेतील गती आणि उर्जा ही त्यांच्या मुंबई शहरात वावरत असताना आलेल्या उर्जेतून प्राप्त होते. ते एक रोमँटिक कलाकार नाहीत तर विचारगर्भ कलाकार आहेत. कला ही मायावी अवस्था असते. एकच सत्य दोन कोनातून पाहताना वेगवेगळे दिसते आणि या रचनेला 'चैतन्यदृश्याचे आव्यूह' म्हणता येते. त्यांचा प्रत्यय अशोक हिंगे यांच्या दृश्यचित्रात येतो. चित्राचा मूळ आधार प्रकाशीय दृश्यध्वनी असून तो एकच असला तरी, त्याच्या अनेक छटांचे एकाच जातकुळीचे दृश्यध्वनी एकत्र आले की एक गुंजारव उभा राहतो. 'दृश्य आव्यूह' हा एक अतिसंमिश्र जटिल दृश्यप्रकार आहे. तशा अनुभवांची दृश्य नोंद हिंगे यांच्या चित्रांमध्ये मांडली गेली आहे.

हिंगे यांची चित्रे पाहताना किंवा अन्य कोणतेही चित्र पाहण्यासाठी चित्राचे तनपोत आणि चित्रांचे गुणमन ओळखून, चित्रातले तंत्र समजून घेतले की चित्रातील भौतिक दृश्याचा आनंद घेता येतो. हिंगे यांची चित्रे तथाकथित अमूर्त प्रकारातली नसून, ती जाणिवेच्या चेतनेची मूर्त रुप आहेत. सेंद्रिय नैसर्गिक साधर्म्यामुळे अशोक यांची चित्र प्रकृतीची स्वतंत्र प्रतिकृती वाटावी अशी ही चित्रे आहेत. यामुळे ती दृश्य चैतन्याची मूर्तरुपे आहेत. हाच चेतन जगताच्या दृश्याचा आव्यूह आहे. तो तसाच उलगडत पहावा असा आहे.

Web Title: Ashok Hinge s 'Matrix of Consciousness painting exhibition at Jahangir art gallery mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई