उमाकांत देशपांडे
मुंबई: शहरातील केंद्र व राज्य शासनाच्या विविध यंत्रणांच्या समन्वयासाठी स्वतंत्र प्राधिकरण असावे की, महापालिकेला नोडल एजन्सी म्हणून अधिकार देण्यात यावेत, या मुद्द्यावर राजकीय व महापालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे आणि मागण्या करण्यात येत आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा व अन्य विकास कामे सुरू असल्याने मुंबईकरांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. राज्य सरकारने महापालिकेला नोडल एजन्सी म्हणून अधिकार द्यावेत, असेही काही नेत्यांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांमध्ये समन्वयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घ्यावी, अशी सूचना उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.
शहरात महापालिका, एमएमआरडीए, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, म्हाडा, मेट्रो, महानगर गॅस, रेल्वे, बीपीसीएल, एचपीसीएल, महानगर टेलिफोन निगम आदी विविध यंत्रणा असून, त्यांच्यात समन्वयासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यास अनेक प्रश्न सुटू शकतील, असे मत शेलार यांनी व्यक्त केले. शहराचा विकास एकत्रित व जनताभिमुख पद्धतीने व्हावा, अशी भूमिका असल्याचे शेलार यांनी सांगितले.
'महापालिकेला नोडल एजन्सी नियुक्त करावे'
महापालिकाही स्वायत्त असून, अनेक वर्षे शहराचे नियोजन प्राधिकरण म्हणून काम करीत आहे. पण नंतरच्या काळात एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, विमानतळ प्राधिकरण अशी अनेक नियोजन प्राधिकरणे स्थापन करण्यात आली.
पालिकेलाच शहराच्या नियोजनाचे पूर्ण अधिकार असावेत. पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ, निधी आणि कायदेशीर अधिकार आहेत. महापालिकेवर जनतेचे प्रतिनिधी निवडून गेले आहेत. त्यामुळे पालिकेची कामे व निर्णयप्रक्रियेवर त्यांचे नियंत्रण आहे, असे उद्धवसेनेचे आ. अॅड. अनिल परब यांनी 'लोकमत'ला सांगितले.
नालेसफाईही वेळेत पूर्ण होणे गरजेचे
पावसाळा दोन महिन्यांवर आला असला तरी मुंबईत अनेकदा पूर्वमोसमी पाऊस मे महिन्यातही जोरदार झाला होता. त्यात शहराची दैना उडाली होती आणि नालेसफाई न झाल्याने 'तुंबापुरी' झाली होती. त्यामुळे यावर्षी नालेसफाईची कामे मे अखेरीच्या आधीच पूर्ण झाली, तर मुंबईकरांना त्रास होणार नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या विविध यंत्रणांमध्ये योग्य समन्वय राहिल्यास मुंबईकरांना फारसा त्रास होणार नाही.
वारंवार खोदकामांमुळे त्रास
मुंबईत एमएमआरडीएकडून मेट्रोच्या विविध मार्गिकांची कामे सुरू असून, पूल, रस्त्यांची कामे सुरू आहेत. पालिकेकडून क्राँक्रीटच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याआधी अनेक ठिकाणी पीएनजी पाइपलाइन, दूरसंचार विभागाच्या व खासगी कंपन्यांच्या केबल्स टाकणे, पाणी आणि सांडपाणी वाहिन्यांची कामे सुरू आहेत. रस्त्यांच्या खोदकामामुळे नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यांची कामे झाल्यावर पुन्हा काही कारणांसाठी ते खोदले जातात. रेल्वेची कामे करताना राज्य शासनाच्या यंत्रणेशी समन्वय राहिल्यास त्याचा नागरिकांना फारसा त्रास होणार नाही. रेल्वेकडूनही पूल उभारणी, मार्गाचा व फलाटांचा विस्तार, नवीन मार्गिका व अन्य कामे सुरू आहेत.
'एकसंध प्राधिकरण हवे'
मुंबईच्या नियोजनातील विस्कळीतपणा दूर करून विकासकामांना गती देण्यासाठी एकसंध नियोजन प्राधिकरण स्थापन करावी, अशी मागणी उद्धवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर रितू तावडे यांना पत्र पाठवत महापालिकेच्या सभेत ठराव मांडण्याची विनंती केली आहे.
'नियमितपणे कालबद्ध बैठका व्हाव्यात'
मुंबईमध्ये राज्य व केंद्र सरकारच्या यंत्रणांची अनेक विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी समन्वयासाठी बैठक बोलवावी आणि गरजेनुसार ती नियमित किंवा कालबद्ध पद्धतीने व्हावी, अशी अपेक्षा पालकमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केली.
Web Summary : Coordination lacking between agencies causing Mumbai issues. Shelar suggests CM meeting. Parabsays BMC should have full planning authority. Need timely drain cleaning. Padwal wants unified planning authority. Regular meetings are expected.
Web Summary : मुंबई में एजेंसियों के बीच समन्वय का अभाव है. शेलार ने मुख्यमंत्री की बैठक का सुझाव दिया. परब का कहना है कि बीएमसी के पास पूरी योजना प्राधिकरण होना चाहिए. समय पर नाला सफाई जरूरी. पडवाल एकीकृत योजना प्राधिकरण चाहते हैं. नियमित बैठकों की उम्मीद है.