Join us

"प्रसाद लाड यांनी सेवक म्हणून केलेलं काम भरीव"; आशिष शेलार यांचे गौरवोद्गार

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 30, 2024 17:32 IST

मन की बातच्या मुहूर्तावर आशिष शेलार यांच्या हस्ते विविध नागरी सेवा उपक्रमांचे उद्घाटन

मुंबई  : आमदार प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या नमो सुविधा शिबीर व मोफत स्मार्ट कार्ड तसेच रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा अशा कार्यक्रमाचे उद्गाटन भाजपामुंबईचे अध्यक्ष,आमदार अँड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. या अंतर्गत ५०,००० लोकांपर्यंत पुढच्या चार महिन्यात वेगवेगळ्या सुविधा पोहोचवण्याचे लक्ष आहे. हा सोहळा सायन सर्कल येथील आमदार प्रसाद लाड यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयात दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे सामुदायिकरीत्या श्रवण करण्यात आले.  जनतेची सेवा हेच आमचे कर्तव्य आहे. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कर्तव्य भावनेतून हे काम करत असल्याचे आमदार लाड यांनी सांगितले. 

भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी नमो सुविधा केंद्र व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा या दोन्ही उपक्रमांबाबत भाष्य करताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आता संपूर्ण विश्वात असून सरकारने केलेल्या कामांवर पूर्ण भरोसा आहे,पण बरोबरीने आमच्या प्रसाद लाड सारख्या असलेल्या नेत्यांनी खाली सेवक म्हणून केलेलं काम हे भरीव आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. 

खरं तर कोणीही म्हणेल लोकसभाच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि लोकसभाच्या निवडणुकीच्या याच मतदारसंघामध्ये आमचा मध्य दक्षिणचा महायुतीचा उमेदवार हा दुर्दैवाने यश नाही मिळवू शकला. पण त्यांनतर अशी काय गरज होती की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, प्रसाद लाड आणि सहकार्यांना एक सेवाकार्य सुरु करावसं वाटलं, याचं कारण एक तर समोर आलेला नागरिक आणि मुंबईकर यात आम्ही देव बघतो देव आणि त्यांची सेवा केली  पाहिजेअसे मत शेलार यांनी व्यक्त केले.

कोणीच आजारी पडू नये, गरजू मुंबईकराला जर आयसीयूची ऍम्ब्युलन्स हवी असेल त्याला ती तात्काळ उपलब्ध होण्याचा आमदार प्रसाद लाड यांनी विचार केला आणि आज त्याचे लोकार्पण याठिकाणी झाले. येथील सेवाकेंद्रात मोफत स्मार्ट कार्ड, याठिकाणी अटल पेन्शन योजना, आधार कार्डच सिडींग होणार आणि याठिकाणी इ-श्रम कार्ड मिळणार आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे असे आशिष शेलार म्हणाले.

यावेळी भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर तसेच स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच स्थानिक नागरिकांनी देखील कार्यक्रमास गर्दी केली होती.

टॅग्स :मुंबईप्रसाद लाडआशीष शेलारभाजपा