Join us  

आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 5:19 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेत एका बैठकीत आढावा घेऊनही शेलार यांच्या भेटी सुरूच आहेत. ते नेमके काय साध्य करू इच्छितात, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नालेसफाईबाबत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भेटसत्रावरून महापालिका वर्तुळात अस्वस्थता आहे. पालिकेचे प्रशासक आणि आयुक्त भूषण गगराणी नालेसफाईच्या कामांना स्वतः भेटी देत असताना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेत एका बैठकीत आढावा घेऊनही शेलार यांच्या भेटी सुरूच आहेत. ते नेमके काय साध्य करू इच्छितात, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 

नालेसफाई हा मुंबईकरांसाठी संवेदनशीलतेचा आणि राजकीय वर्तुळात जिव्हाळ्याचा विषय. पावसाळ्यात पाणी तुंबून अनावस्था प्रसंगांना सामोरे जावे लागू नये याची चिंता नागरिकांना असते आणि पालिकेच्या राजकीय वर्तुळात हे काम कोण कसे करतेय, यावरून बरेच घमासान रंगते. लोकसभेसाठी मतदान पार पडल्याबरोबर आ. शेलार यांच्या नालेसफाईच्या कामांना भेटी सुरू झाल्या. पालिकेत सध्या प्रशासकराज असले तरी आयुक्तांची नियुक्ती महायुती सरकारने केली आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या नियुक्त्याही सरकारच करत असते. परिणामी, पालिकेवर सत्ता महायुतीचीच आहे. भेटींचा सपाटा लावून राजकीय आणि प्रशासकीय दबावतंत्र तर अवलंबले जात नाही ना, याची चर्चा आहे.

हे सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पालिकेला भेट दिली आणि पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अनुक्रमे दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा हेही बैठकीला उपस्थित होते. काही माजी नगरसेवकही तिथे हजर होते; पण महायुतीचा प्रमुख घटकपक्ष भाजपचे आ. शेलार मात्र अनुपस्थित होते. या पार्श्वभूमीवरही शेलार यांनी शनिवारी मालाड (प.), अवधूतनगर नाला दहिसर (पू.)  एन. एल. कॉम्प्लेक्सजवळील नाला व दहिसर नदीची पाहणी केली. पश्चिम उपनगरातील नालेसफाई समाधानकारक नाही आणि पालिका सांगतेय ती आकडेवारी आणि प्रत्यक्ष चित्र यात तफावत आहे, असे शेलार म्हणाले. वळणई नाल्यातून अजून गाळ काढण्यात येत असल्याचे सांगत त्यांनी पालिकेवर शरसंधान साधले.

खासगी संस्था करणार का?

  • गतवर्षीही आ. शेलार यांनी नालेसफाईच्या कामांना भेटी दिल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नालेसफाईचा आढावा घेतल्यानंतर एका खासगी संस्थेचे लोक दोन-तीन दिवसांनी तिथे भेट देऊन काम सुरू आहे का, ते किती पूर्ण झालेय याचा अहवाल तयार करत.
  • परिणामी पाणी तुंबण्याच्या फार घटना समोर आल्या नाहीत. याही वर्षी अशी खासगी संस्था पाहणी करतेय का, हे समोर आलेले नाही.

‘नालेसफाई पाहणी करायला ठाकरे लंडनला गेले का?’

नालेसफाईवरून मुंबई पालिका प्रशासन आणि उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधण्याचे काम  मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सुरूच ठेवले आहे. पश्चिम उपनगरातील नालेसफाईची सलग तिसऱ्या दिवशी पाहणी करताना उद्धव ठाकरे कुठे आहेत? लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का? असा खोचक सवाल त्यांनी  केला.

अंधेरी, वर्सोवा या नाल्यांची पाहणी केल्यानंतर शेलार यांनी वळणई नाला लिंक रोड मालाड  (पश्चिम), अवधूत नगर नाला दहीसर (पूर्व)  एन. एल. कॉम्प्लेक्सजवळील नाला व दहीसर नदीची पाहणी केली. आम्ही नालेसफाईच्या कामाची पाहणी करत आहोत.

पालिकेची आकडेवारी आणि प्रत्यक्ष चित्र यामध्ये तफावत आहे. वळणई नाल्याची  ९५.५  टक्के  सफाईचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात गाळ नाल्यातून काढलाच जात आहे, असे ते म्हणाले. नालेसफाईबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागत आहे. शिंदे जबाबदार मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांच्या रूपाने यापूर्वी बेजबाबदार मुख्यमंत्री मुंबईकरांनी पाहिला, असा टोला त्यांनी लगावला. 

टॅग्स :मुंबईएकनाथ शिंदेआशीष शेलार