Join us  

'उठा उठा आषाढी आली, 'स्वबळावर' गाडी चालवत पंढरीला जायची वेळ आली', सदाभाऊ खोतांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 6:54 PM

Sadabhau Khot criticizes CM Uddhav Thackeray: रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.

Sadabhau Khot criticizes CM Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत मुसळधार पावसात पंढरपूरकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे देखील आहेत. भाजपासह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आता मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर प्रवासावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजापचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यानंतर आता रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. (Ashadhi Wari 2021 Sadabhau Khot criticizes CM Uddhav Thackeray)

'उठा उठा आषाढी आली, 'स्वबळावर' गाडी चावलत पंढरीला जायची वेळ झाली', अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, नवी मुंबईल, पालघर, रायगड पट्ट्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. खराब हवामानामुळे विमानानं पंढरपूरला जाणं शक्य नसल्यानं मुख्यमंत्री ठाकरे यांनी रस्ते मार्गानंच प्रवास करण्याचा निर्णय घेतला. स्वत: ड्रायव्हिंग करत ते पंढरपूरकडे निघाले आहेत. मुसळधार पावसामुळे नेहमीची मर्सिडिज ऐवजी ते रेंज रोव्हर कार घेऊन रवाना झाले आहेत. 

'वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री...', भाजपा नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर प्रवासावरुन भाजापचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही ट्विट करत निशाणा साधला आहे.  "जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. एमपीएससी विद्यार्थ्यांचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला. वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री...", अशा ओळींमधून उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. 

टॅग्स :सदाभाउ खोत उद्धव ठाकरेपंढरपूरआषाढी एकादशी