Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला धक्का लागताच, पतीची तरुणाला मारहाण; कोल्हापूरच्या दाम्पत्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 12:33 IST

रेल्वे मार्गावर पडून लोकलच्या धक्क्याने मृत्यू.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मद्यधुंद अवस्थेत फलाटावर आलेल्या तरुणाचा एका महिलेला धक्का लागला. याच रागात महिलेने छत्रीने मारहाण केली. त्यानंतर महिलेच्या पतीनेही त्याला मारताच तो ट्रॅकवर कोसळला आणि बाहेर निघेपर्यंत आलेल्या लोकलच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी बुधवारी कोल्हापूरच्या दाम्पत्याला बेड्या ठोकल्या आहेत.  अविनाश माने (३१) व शीतल अविनाश माने (३०) असे दाम्पत्याचे नाव आहे. 

दिनेश राठोड (२६) असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो नवी मुंबईतील घणसोली गावातील रहिवासी आहे. तो बेस्टमध्ये वाहक पदावर काम करीत होता. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. माने दाम्पत्य मूळचे कोल्हापूरचे रहिवासी असून, मान खुर्द परिसरात राहतात. सायन रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांकडे अपमृत्यूची नोंद झाली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या तपासणीदरम्यान राठोड जिन्यावरून फलाट क्रमांक १ वर आला. त्यावेळी एका महिलेला त्याचा धक्का लागला.

बाहेर काढलेच नाही

- गाडी येईपर्यंत दाम्पत्य त्याला बाहेर काढू शकत होते. मात्र, त्यांनी त्याला वेळीच बाहेर न काढल्यामुळे लोकलच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

- तसेच राठोड हा नशेत अंगावर पडल्याने दाम्पत्याने त्याला मारहाण केल्याचेही मानेच्या बाजूने न्यायालयात सांगण्यात आले. 

- याप्रकरणी दादर रेल्वे पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

-  या घटनेने राठोड यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

 

टॅग्स :गुन्हेगारी