‘गोरेगाव-मुलुंड’ प्रकल्प खर्च वाढताच... ८०० कोटींची वाढ; विरोधकांचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 13:04 IST2026-03-08T13:04:29+5:302026-03-08T13:04:56+5:30
प्रकल्प खर्चाच्या वाढीवर विरोधकांनी आक्षेप घेतला असून कंत्राटात संगनमत झाल्याचा आरोपही केला आहे.

‘गोरेगाव-मुलुंड’ प्रकल्प खर्च वाढताच... ८०० कोटींची वाढ; विरोधकांचा आक्षेप
मुंबई : गोरगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यात मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्ग ते ऐरोली टोल नाका या दरम्यान प्रकल्पाचा विस्तार करण्यात येणार असून प्रकल्प खर्चात सुमारे ८०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी या कामासाठी सुमारे १,३८२ कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. मात्र विविध तांत्रिक बदल, सुधारणा आणि करांचा समावेश यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढून सुमारे २,१९३ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, प्रकल्प खर्चाच्या वाढीवर विरोधकांनी आक्षेप घेतला असून कंत्राटात संगनमत झाल्याचा आरोपही केला आहे. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला, तर उद्धवसेनेचे नगरसेवक यशोधर फणसे यांनीही खर्च वाढीबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. तर मुंबई आयआयटीच्या सल्ल्यानुसार आराखड्याचे पुनरावलोकन करण्यात आले असून सुचविलेल्या सुधारणा आणि वस्तू व सेवा करासह इतर करांचा समावेश केल्याने खर्चात वाढ झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
एकूण १२.२० किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प चार टप्प्यांत विभागला आहे. चौथ्या टप्प्यात पूर्व द्रुतगती महामार्गावरील विद्यमान उड्डाणपुलावर दुसऱ्या स्तरावर नवीन उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन आहे. उड्डाणपुलाची एकूण लांबी सुमारे १,३३० मीटर असून २७० मीटर लांबीचे पोहोच रस्ते असतील.
प्रकल्पाचे चार टप्पे
पहिला टप्पा: नाहूर येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे रुंदीकरण .
दुसरा टप्पा: गोरेगाव-मुलुंड विद्यमान रस्त्याचे ३०.०० मीटर रुंदीवरून ४५.७० मीटर रुंदीकरण.
तिसरा टप्पा: गोरेगाव-मुलुंड जोड-रस्त्यावरील मुख्य चौकांमधील वाहतूक सुधारण्यासाठी उड्डाणपूल व बोगद्यांचे बांधकाम. या टप्प्याचे काम दोन भागांत विभागले आहे.
चौथा टप्पा: पूर्व द्रुतगती महामार्ग आणि गोरेगाव-मुळुंद जोड-रस्त्याच्या जंक्शनमध्ये सुधारणा.