‘तो’ फलक येताच वेगाला आवर, नंतर पुन्हा सुसाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:18 IST2025-10-06T10:17:48+5:302025-10-06T10:18:37+5:30
कोस्टल रोडवर भरधाव वाहने चालवणे सुरूच आहे. पालिकेने येथे वेग मोजणारी यंत्रणा बसवली असून भरधाव वाहनांना चालानद्वारे दंड आकारला जात आहे.

‘तो’ फलक येताच वेगाला आवर, नंतर पुन्हा सुसाट
- अमर शैला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोस्टल रोडवर वेग दर्शविणाऱ्या फलकाजवळ वाहनांचा वेग कमी केला जातो. अनेक वाहने या भागात ४० ते ५० किमी वेगाने धावतात. मात्र, हा फलक जाताच वाहनांचा वेग पुन्हा वाढ असल्याचे ‘लोकमत’ने रविवारी केलेल्या ‘रिॲलिटी चेक’मध्ये आढळले.
कोस्टल रोडवर भरधाव वाहने चालवणे सुरूच आहे. पालिकेने येथे वेग मोजणारी यंत्रणा बसवली असून भरधाव वाहनांना चालानद्वारे दंड आकारला जात आहे. त्यामुळे काही चालक शिस्तीत असतात. मात्र, अजूनही वाहनांचा वेग कमी होत नसल्याचे चित्र आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करून वाहने ८० किमी प्रतितास ऐवजी १०० ते १२० किमी प्रतितास वेगाने चालवली जात आहेत.
‘दंडाच्या भीतीमुळे वेगाला घालतात आवर’
नियमभंग करणाऱ्या वाहनांना वाहतूक पोलिसांनी चालान आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी कोस्टल रोडवर कॅमेरे बसविले आहेत.
त्यातून दंड आकारला जाण्याच्या भीतीने अनेक वाहने वेगाच्या नियमाचे पालन करताना दिसतात. तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे दंड बसल्याने आता अनेक जण नियम पाळत आहेत, अशी माहिती एका टॅक्सी चालकाने दिली.