‘अरे मैं सैफ अली खान हूँ म्हणताच स्ट्रेचर घेऊन आले’, रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने सांगितले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 10:47 IST2025-01-18T10:46:55+5:302025-01-18T10:47:08+5:30
भजन सिंह सांगतात, रात्री अडीच ते पावणे तीनच्या सुमारास वांद्रे येथील सतगुरू शरण इमारतीच्या गेटमधून घाबरलेल्या अवस्थेत एका महिलेचा ‘रिक्षा, भैया रुको’ असा जोरात आवाज कानी पडला.

‘अरे मैं सैफ अली खान हूँ म्हणताच स्ट्रेचर घेऊन आले’, रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने सांगितले...
मुंबई : रात्री अडीच ते पावणे तीनच्या सुमारास रिक्षासाठी आवाज येताच गाडी गेट जवळ नेली. तेव्हा काही जणांच्या घोळक्यात रक्तबंबाळ व्यक्ती समोर दिसली. तिला रिक्षात बसवून तत्काळ लीलावती रुग्णालयाच्या इमर्जन्सी गेटवर गाडी लावून डॉक्टरांना आवाज दिला. कर्मचारी व्हिलचेअर घेऊन आले. थोड्याच वेळात, रक्तबंबाळ झालेली व्यक्ती उतरून, अरे मै सैफ अली खान हूँ, बोलताच तेथील कर्मचाऱ्यांची स्ट्रेचर घेऊन येत धावाधाव सुरू झाली.
तेव्हा, रिक्षातून बॉलीवूड स्टारला आपण आणल्याचे समजले असे रिक्षा चालक भजन सिंह यांनी सांगितले. त्यांनी सैफला वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
भजन सिंह सांगतात, रात्री अडीच ते पावणे तीनच्या सुमारास वांद्रे येथील सतगुरू शरण इमारतीच्या गेटमधून घाबरलेल्या अवस्थेत एका महिलेचा ‘रिक्षा, भैया रुको’ असा जोरात आवाज कानी पडला. मी पुढे गेलेलो मागे यू-टर्न घेत गेटकडे वेगाने आलो. तेव्हा काही वेळातच एक व्यक्ती रक्ताने माखलेल्या अवस्थेत समोर येताना दिसली. सोबत एक लहान मुलही होते.
कोणत्यातरी वादात जखमी झाल्याचे समजून त्या व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे मी त्यांना लीलावतीच्या दिशेने घेऊन निघालो. ते मुलाशी काहीतरी बोलत होते. मला फक्त कितना टाइम लगेगा, एवढेच विचारले. मीही अवस्था बघून अवघ्या ८ ते १० मिनिटात त्यांना शॉर्ट कटने लीलावती रुग्णालयाच्या इमर्जन्सी गेटकडे रिक्षा थांबवून इमर्जन्सी म्हणून आवाज दिला. सुरुवातीला माझ्याकडे बघून त्यांनाही रिक्षातून कोण येथे आले, असा प्रश्न पडला.
काही कर्मचारी फक्त व्हिलचेअर घेऊन येताच, रिक्षातून उतरलेल्या सैफ अली यांनी स्वत:चे नाव सांगून स्ट्रेचर घेऊन येण्यास सांगताच सगळ्यांची पळापळ सुरू झाली. मलाही गाडीत स्टार बसल्याचे समजले नाही. जाताना हात दाखवून ते पुढे गेले. एवढ्या मोठ्या व्यक्तीला रिक्षात बसवून वेळीच रुग्णालयात पोहोचवले याचे समाधान खूप होते. त्यांना सोडल्यानंतर पुन्हा काही वेळाने रुग्णालय परिसरात आलो तेव्हा मोठ्या प्रमाणात पोलिस दिसले.