Join us
Daily Top 2Weekly Top 5

लटकत, लोंबकळत प्रवासामुळे ५६५ जणांचा बळी; प्रवासी संघटनांकडून संताप व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 09:57 IST

गेल्या काही वर्षांत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मुंबई : गेल्या काही वर्षांत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरवाजात लटकत, लोंबकळत कराव्या लागणाऱ्या प्रवासामुळे होणाऱ्या अपघातांत १ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत तब्बल ५६५ जणांचा बळी गेला आहे. वाढत्या अपघातांवर रेल्वे प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त करतानाच संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचे बळी जात असून, त्याकडे रेल्वे प्रशासन व राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. कोरोनानंतर प्रवाशांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मात्र, त्या तुलनेत सर्वसाधारण लोकलच्या फेऱ्या वाढलेल्या नाहीत. त्यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून प्रवाशांचे बळी जात आहेत. परंतु, हे बळी केवळ मृत्यू नसून ही मोठी हानी आहे. 

आंदोलनास परवानगी नाकारली -

१)  लोकल गर्दीचे बळी वाढत असल्याने प्रवासी संघटनांनी डोंबिवली येथे शुक्रवारी आंदोलनाचा निर्णय घेतला होता. 

२)  लोकसभा निवडणुकीमुळे रेल्वे संघटनांना आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे. 

३) संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत जीआरपी चर्चा करणार असून, त्यातून तोडगा निघेल, असा विश्वास रेल्वे संघटनांनी व्यक्त केला आहे.

लोकल फेऱ्या वाढविणे शक्य नसेल तर मुंबई महानगर प्रदेशातील कार्यालयांच्या वेळा बदलण्याची मागणी आम्ही मागील १५ वर्षे करीत आहोत. राज्य शासन यावर कोणतीही कार्यवाही करीत नाही. तर, रेल्वे प्रशासनाला वातानुकूलित लोकल लादण्याची घाई झाली आहे. अशा परिस्थितीत रेल्वे आणखी किती लोकल प्रवाशांचे बळी घेणार आहे, असा संतप्त सवाल लोकल प्रवासी करत आहेत. - नंदकुमार देशमुख,अध्यक्ष, रेल्वे प्रवासी महासंघ

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वेअपघात