‘मनोरंजन देशाला आनंदी ठेवते, यावर कलाकार म्हणून माझा ठाम विश्वास’: सई परांजपे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 09:14 IST2026-01-10T09:13:59+5:302026-01-10T09:14:40+5:30
ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार

‘मनोरंजन देशाला आनंदी ठेवते, यावर कलाकार म्हणून माझा ठाम विश्वास’: सई परांजपे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बालपणापासून फँटसीमध्ये रमले. करिअरमध्ये पटकथा लेखन महत्त्वाचे राहिले. यात मामा अच्युत रानडे आणि गीतकार शांताराम आठवले यांचे मोठे योगदान होते. माझे करिअर रेडिओपासून सुरू झाले. बालोद्यानामुळे दिशा मिळाली. आजवरच्या कारकीर्दीत खूप काम केले, पण बालरंगभूमी माझ्या जीवनातील वैभवशाली भाग असून, मनोरंजन देशाला आनंदी ठेवते, यावर माझा ठाम विश्वास आहे, असे ज्येष्ठ लेखिका-दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांनी म्हटले आहे. २२ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवात त्या बोलत होत्या.
प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये राज्याचे सांस्कृतिक सचिव डॅा. किरण कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तर दिग्दर्शिका उमा दा कुन्हा यांना ‘सत्यजीत रे स्मृती पुरस्कार’ यांना जाहीर झाला, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या समारंभाला उपस्थित राहू शकल्या नाहीत.
किरण शांताराम म्हणाले की, एशियन फाउंडेशनतर्फे या वर्षांपासून नवोदित दिग्दर्शक पुरस्कार देणार आहोत. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त माझा मुलगा राहुल शांताराम त्यांचा चरित्रपट बनवत असल्याचेही त्यांनी सांगितले. सोनाली म्हणाली की, बाविसाव्या वर्षी हा महोत्सव तारुण्यात आला आहे. संतोष पाठारे यांनी २२ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाची माहिती दिली. दरम्यान, या महोत्सवात आशियाई तसेच भारतीय, अशा एकूण ५६ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.