Aryan Khan Drugs : नवाब मलिकांच्या टीकांना आळा घालावा, न्यायालयात याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 19:00 IST2021-10-27T18:05:41+5:302021-10-27T19:00:51+5:30
Aryan Khan Drugs : उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून, समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या टीकेला आळा घालण्याची मागणी करण्यात आली होती

Aryan Khan Drugs : नवाब मलिकांच्या टीकांना आळा घालावा, न्यायालयात याचिका दाखल
मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. समीर यांच्या समर्थनार्थ आता त्यांचे कुटुंबीय आणि मूळ वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वरुड तोफा गावचे गावकरी आले आहेत. त्यातच, मंत्री मलिक यांच्याकडून सातत्याने समीर वानखेडे यांच्याविरुद्धच्या टीकेला आणि आरोपाविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर, तात्काळ सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून, समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या टीकेला आळा घालण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने या याचिकेवर तात्काळ सुनावणीला नकार दिला आहे. मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायमू्र्ती एमएस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर एक व्यवसायीक आणि मौलाना असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने संबंधित याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची मागणी केली होती. त्यावर, न्यायालयाने दिवाळीपर्यंत वाट पाहण्याची किंवा व्हॅकेशन खंडपीठाकडे जाण्याची सूचना याचिकाकर्त्याला केली आहे.
दरम्यान, अधिवक्ता अशोक सरावगी यांच्या माध्यमातून दाखल याचिकेत, मंत्री नवाब मलिक यांच्याकडून तपास यंत्रणांचे मनोबल खच्ची करण्याच्या उद्देशाने केलेल्या टिपण्णींना आळा घालणे किंवा थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही व्यक्तिगत हल्ला न करण्याच्या सूचना मलिक यांना देण्याची मागणी करण्यात आली.