Aryan Khan Bail : आर्यनला जामीन मिळाल्याचा आनंद, वकिलांच्या टीमसोबत शाहरुख दिसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 21:59 IST2021-10-28T21:58:41+5:302021-10-28T21:59:40+5:30
आर्यन खानकडे कुठलंही ड्रग्ज सापडलं नव्हतं. त्यामुळे, सुरुवातीपासूनच आर्यन खान यांना केलेली अटक बेकायदेशीर होती, शाहरुख खान यांच्या लढाईचं हे यश आहे.

Aryan Khan Bail : आर्यनला जामीन मिळाल्याचा आनंद, वकिलांच्या टीमसोबत शाहरुख दिसला
मुंबई - राजधानी मुंबईतील क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अखेर उच्च न्यायालयाकडून आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी न्यायालयाकडून आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला, त्याचदिवशी आर्यन खानला पकडून एनसीबीच्या ताब्यात देणाऱ्या किरण गोसावीला 8 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यनला जामीन मिळाल्यामुळे मन्नत बंगल्यावर आनंदाचे वातावरण आहे, तर शाहरुखच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून येत आहे. शाहरुखचा, वकिलांच्या टीमसोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
आर्यन खानकडे कुठलंही ड्रग्ज सापडलं नव्हतं. त्यामुळे, सुरुवातीपासूनच आर्यन खान यांना केलेली अटक बेकायदेशीर होती, शाहरुख खान यांच्या लढाईचं हे यश आहे. त्यामुळे, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शाहरुख खान आनंदी होते, असे शाहरुख खान यांच्या बाजुने सत्र न्यायालयात युक्तीवाद करणारे वकील मानेशिंदे यांनी म्हटलं आहे. आर्यन यांना अटक केलेल्या दिवसापासून म्हणजे 2 नोव्हेंबरपासून आजतागायत तपास यंत्रणांकडे त्यांच्याबद्दलचा कुठलाही ताबा, कुठलाही पुरावा नाही, कुठलाही कट नाही, कुठलाही उपभोग नाही. त्यामुळेच, आर्यन खान यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, असेही मानेशिंदे यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं.
आर्यनसह ड्रग्ज बाळगणाऱ्या मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन आज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. हे तिघेही उद्या किंवा परवा आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनच्या न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर आज आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे, चाहत्यांनी मन्नत बंगल्याबाहेर आनंदोत्सव साजरा केला, तर शाहरुखचाही हसरा चेहरा दिसला.