गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई
By मनीषा म्हात्रे | Updated: July 23, 2025 11:44 IST2025-07-23T11:43:44+5:302025-07-23T11:44:09+5:30
अनेक मोठ्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये संशयित आरोपींची स्केचेस रेखाटून मुंबई पोलिसांना मदत करणारे स्केच आर्टिस्ट नरेश कोर्डे आता अध्यात्माच्या मार्गावर चालत आहेत.

गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ७/११च्या बॉम्बस्फोटांतील आरोपींसह अनेक मोठ्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये संशयित आरोपींची स्केचेस रेखाटून मुंबई पोलिसांना मदत करणारे स्केच आर्टिस्ट नरेश कोर्डे आता अध्यात्माच्या मार्गावर चालत आहेत. ते सध्या ‘महाराज’ म्हणून ओळखले जात आहेत. अनेक दहशतवाद्यांचे चेहरे रेखाटून पोलिसांना केलेल्या मदतीमुळे काही गुन्हेगार त्यांच्या मागावर होते. त्यामुळे त्यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि अध्यात्माचा मार्ग स्वीकारला.
कोर्डेंनी १९९९ साली वयाच्या १४व्या वर्षापासून घाटकोपर पोलिस ठाण्यात ‘सहाय्यक’ म्हणून काम सुरू केले. हुबेहूब स्केचेस बनवण्याचे त्यांचे कौशल्य हा चर्चेचा विषय बनला. त्यांना प्रत्येक स्केचसाठी सुरुवातीला ५०० रुपये मिळत, पण नंतर १०,००० रुपये मिळू लागले. कोर्डेंनी ७/११ बॉम्बस्फोट प्रकरणात रेखाटलेली आरोपींची स्केचेस महत्त्वाची ठरली. ‘एटीएस’चे तत्कालीन अधिकारी सुनील देशमुख यांनी राजेश सातपुते नावाच्या टॅक्सी ड्रायव्हरने दिलेल्या माहितीच्या आधारे काही संशयितांची स्केचेस तयार करण्यास सांगितले होते, असे कोर्डे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एआए) २००८ मध्ये कोर्डेंना दिल्लीला बोलावले. तेथे एका गुप्त ठिकाणी त्यांची गाठ एका महत्त्वाच्या साक्षीदाराशी घालून देण्यात आली. त्याने केलेल्या वर्णनावरून कोर्डेंना संशयितांचे चेहरे रेखाटायचे होते. “एनआयने विमानतळावरून उचलून एका जुन्या इमारतीत नेले. सगळे काम अत्यंत गोपनीय होते”, असे कोर्डे यांनी सांगितले.
कोर्डेंना गुन्हेगारांकडून सातत्याने धमक्या येत असत, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असे. म्हणून प्रथम त्यांनी मुंबईच्या उपनगरात आणि नंतर अहमदनगरला स्थलांतर केले. त्याबाबत कोर्डे म्हणाले, तुम्हाला स्वतःपेक्षा कुटुंबाची काळजी अधिक असते.
आता मी देवभक्तीत रमलो आहे...
कोर्डे यांना अजूनही स्केचिंगचे खासगी स्वरूपाचे प्रस्ताव येतात. मात्र त्यांनी आता आपल्या दैनंदिन आयुष्यात अध्यात्म, मंदिर सेवा आणि कुटुंबाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. “आता मी देवभक्तीत रमलो आहे.
आयुष्य खूप शांत आणि समाधानी आहे. मला एका स्वप्नातून मंदिर बांधण्याची प्रेरणा मिळाली. त्यानुसार, नगरला गावी मंदिराची स्थापना केली”, असे कोर्डेंनी सांगितले. याच मंदिरात कोर्डे ‘महाराज’ म्हणून ओळखले जात आहेत.