आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा यंदा नालेसफाईवर ‘वाॅच’; उद्यापासून कामाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 14:08 IST2025-03-24T13:59:44+5:302025-03-24T14:08:23+5:30
सुरु असलेल्या कामाचे चित्रीकरण करणं होणार बंधनकारक

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा यंदा नालेसफाईवर ‘वाॅच’; उद्यापासून कामाला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील नालेसफाईला मंगळवारपासून सुरुवात होत असून, या कामात पारदर्शकतेसाठी महापालिका प्रथमच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची (एआय) मदत घेणार आहे. नाल्यांतील गाळ काढण्याच्या कामाचे फोटो आणि ३० सेकंदांचे व्हिडीओ चित्रीकरण करणे कंत्राटदारांना बंधनकारक आहे. त्याचबरोबर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्ही चित्रीकरण करावे लागणार आहे. या सर्व चित्रीकरणांचे ‘एआय’द्वारे विश्लेषण करण्यात येणार आहे.
शहर आणि उपनगरांतील नाल्यांतील गाळ काढण्याच्या कामाचे यंदा २३ कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. लहान नाल्यांच्या उगमापासून पातमुखापर्यंत गाळ काढण्याच्या कामाचे चित्रीकरण करणे कंत्राटदारांना बंधनकारक आहे. नालेसफाईचे काम सुरू होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरू असताना आणि काम पूर्ण झाल्यानंतर दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअलटाइम जिओ-टॅग) यासोबत फोटो व व्हिडीओ तयार करून ते संबंधित सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना अनिवार्य आहे.
मुंबईतील नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे ठरवलेल्या वेळेत पूर्ण करावीत, आवश्यक तेथे अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री नेमून कामांना गती द्यावी. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कामांची पारदर्शकता आणि गुणवत्ता तपासावी.
-भूषण गगराणी, आयुक्त, मुंबई महापालिका
‘मिठी’साठी मुहूर्त नाही
मिठी नदीतील गाळ काढण्याच्या निविदा प्रक्रियेत एका विशिष्ट अटीमुळे अनियमितता झाल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला होता. तसेच काही कंत्राटदार न्यायालयात गेले होते. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यामुळे नदीच्या सफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डम्पिंगवरही नोंद होणार
दररोज नाल्यांतून काढलेला गाळ ठेवण्याची जागा, गाळ भरण्यापूर्वीचा रिकामा डम्पर, त्यात गाळ भरल्यानंतरचे दृश्य, गाळ भरलेले वाहन डम्पिंगवर जाण्यापूर्वी वजन काट्यावर केलेल्या वजनाची मानवी हस्तक्षेपाशिवाय थेट सॉफ्टवेअरमध्ये होणारी नोंद, गाळ वाहून नेल्यानंतर डम्पिंगवर पोहोचलेल्या वाहनांची माहिती, क्रमांक आणि वेळ यांची नोंद करणे आवश्यक आहे.