बम्बार्डियर लोकलचे आगमन एक वर्ष लांबले
By Admin | Updated: May 20, 2014 02:47 IST2014-05-20T02:47:51+5:302014-05-20T02:47:51+5:30
जर्मन बनावटीच्या ७0 बम्बार्डियर लोकल टप्प्याटप्प्याने मुंबईत २0१६पर्यंत येणार होत्या

बम्बार्डियर लोकलचे आगमन एक वर्ष लांबले
मुंबई : जर्मन बनावटीच्या ७0 बम्बार्डियर लोकल टप्प्याटप्प्याने मुंबईत २0१६पर्यंत येणार होत्या. मात्र आता काही तांत्रिक कारणे आणि मध्य रेल्वेमार्गावर रखडलेले डीसी-एसी परावर्तनामुळे या लोकल २0१७पर्यंत येतील, असे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. एकूण ७२ बम्बार्डियर लोकलपैकी २ लोकल मुंबईत दाखल झाल्या असून, त्यांची चाचणी घेण्यात येत आहे. बम्बार्डियर कंपनीच्या ७२ लोकलपैकी यापूर्वी २ लोकल आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दाखल झाल्या असून, त्यांच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर चाचण्या सुरू आहेत. पश्चिम रेल्वेवर एका लोकलची चाचणी विरारपर्यंत तर दुसर्या लोकलची चाचणी अंबरनाथ ते कर्जतदरम्यान घेण्यात येत आहे. मार्च किंवा एप्रिल महिन्यात या दोन्ही लोकल प्रवाशांच्या दिमतीला येणार होत्या. या लोकलच्या रेल्वेच्या आरडीएसओकडून ट्रायल सुरू असून, सिग्नल आणि इलेक्ट्रिकल तसेच ताशी ११0च्या वेगाने लोकल चालवण्याची चाचणी घेण्याचे बाकी आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यावर आरडीएसओकडून अहवाल तयार केला जाईल आणि तो पश्चिम रेल्वे सुरक्षा आयुक्तांना पाठवला जाईल. त्यानंतर या लोकल मे महिन्याच्या तिसर्या आठवड्यात सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मात्र असे असतानाच आता टप्प्याटप्प्याने मुंबईत येणार्या ७0 लोकलही उशिरानेच येतील, असे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. मार्च २0१५पर्यंत १२ लोकल, त्यानंतर एप्रिल २0१६पर्यंत ४८ लोकल आणि १0 लोकल २0१७पर्यंत येणार आहेत. मुळात सर्व बम्बार्डियर लोकल २0१६पर्यंत येणार होत्या. मात्र त्यांची होणारी बांधणी आणि त्याचप्रमाणे मध्य रेल्वेमार्गावर सीएसटी ते ठाणेपर्यंत रखडलेले डीसी-एसी परावर्तनाचे काम यामुळे मुंबईत या लोकल आता उशिरानेच येतील, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)