Join us

पोपटाच्या चार पिल्लांची विक्री करणाऱ्यावर कारवाई, गोरेगावमध्ये केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 02:27 IST

शेड्यूल-४ मधील संरक्षित असलेल्या पशु-पक्ष्यांची विक्री व पालन करण्यास २५ हजार रुपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांचा कारावास तसेच दोन्ही शिक्षा देण्याची तरतूद आहे.

मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील बस डेपो येथून पोपटाची पिल्ले विक्रीसाठी नेत असताना वनविभागाने तस्कराच्या मुसक्या आवळल्या. शनिवारी गोरेगाव येथे राहणारा सिद्धेश मांजरे (२५) हा पोपटाची चार पिल्ले विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती डब्ल्यूडब्ल्यूए संस्थेला आणि वनविभागाला प्राप्त झाली. त्यानंतर सापळा रचून तस्कराला ताब्यात घेण्यात आले. ‘अ‍ॅलेक्झाड्रिन पॅराकिट’ प्रजातीच्या पोपटाची ही पिल्ले असून ती शेड्यूल-४ मध्ये संरक्षित आहेत.वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यूडब्ल्यूए)चे अध्यक्ष आदित्य पाटील म्हणाले, गोरेगाव येथील बसडेपोजवळ एक इसम पोपटाची पिल्ले विक्री करण्यासाठी येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. ठाणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बसडेपोजवळ सायंकाळी सापळा रचला. त्या वेळी एक इसम संशयितरीत्या हातामध्ये पुठ्ठ्याचे खोके घेऊन येताना दिसून आला. त्याच्याजवळील खोक्याची तपासणी केली असता त्यामध्ये पोपटाची चार पिल्ले आढळली. अ‍ॅलेक्झाड्रिन पॅराकिट प्रजातीच्या पोपटाची ही पिल्ले होती. अधिक चौकशी केली असता त्याने पिल्ले क्रॉफर्ड मार्केटमधून आणल्याची कबुली दिली. याशिवाय इसमाच्या राहत्या घराची तपासणी केली असता आणखी एक पोपट पक्षी ताब्यात घेण्यात आला.शेड्यूल-४ मधील संरक्षित असलेल्या पशु-पक्ष्यांची विक्री व पालन करण्यास २५ हजार रुपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांचा कारावास तसेच दोन्ही शिक्षा देण्याची तरतूद आहे. आरोपीवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आरोपीला जातमुचलक्यावर सोडण्यात आले आहे. याशिवाय क्रॉफर्ड मार्केटमधून त्याने पोपटाची पिल्ले कोणाकडून घेतली व कोणास विक्री करणार होता? याचा अधिक तपास वन अधिकारी नरेंद्र मुठे करीत आहेत.

टॅग्स :गुन्हेगारी