मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अटी-शर्तींचा भंग केल्याचा आरोप करत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. सदावर्ते यांनी पोलीस महासंचालकांकडे याबाबत तक्रार दाखल केली असून, मुंबई पोलीस आयुक्त आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यातही तक्रार दिली आहे.
या आंदोलनाला भेट दिलेल्या खासदार, आमदारांवरही कारवाई करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे.
नेमकं काय आहे सदावर्तेंचं म्हणणं?गुणरत्न सदावर्ते यांच्या मते, मराठा आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने काही विशिष्ट अटी व शर्तींसह परवानगी दिली होती. मात्र, मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलकांनी या नियमांचे पालन केले नाही. याच आधारावर जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे.
राजकीय नेत्यांवरही कारवाईची मागणीया आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या राजकीय नेत्यांवरही सदावर्ते यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय जाधव आणि बजरंग आप्पा सोनवणे यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदावर्ते यांचा आरोप आहे की, या नेत्यांनी आंदोलनाला भेट देऊन राजकारण केले आणि नियमांचे उल्लंघन करण्यास प्रोत्साहन दिले.
सदावर्ते यांनी आझाद मैदान पोलिसांना या सर्व गंभीर बाबींची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे, आगामी काळात या प्रकरणात काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.